कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:18 AM2018-05-06T00:18:50+5:302018-05-06T00:51:22+5:30
शनिवारी सायंकाळी कळमन्यातील कुख्यात गुंड राजेश महादेवराव खडसे (वय ४०) याची त्याच्या भांडेवाडीतील घरात शिरून सशस्त्र आरोपींनी निर्घृण हत्या केली. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातून बाहेर आला होता, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी सायंकाळी कळमन्यातील कुख्यात गुंड राजेश महादेवराव खडसे (वय ४०) याची त्याच्या भांडेवाडीतील घरात शिरून सशस्त्र आरोपींनी निर्घृण हत्या केली. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातून बाहेर आला होता, हे विशेष.
शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास भांडेवाडीतील राजेशच्या घराच्या दारातून रक्ताचा लोट बाहेर आल्याचे पाहून शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी कळमना पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने राजेशचे घर गाठले तेव्हा तेथे मोठी गर्दी जमली होती. राजेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याचा गळा कापण्यात आला होता. शरीरावर एकूण तीन खोलवर घाव होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह रुग्णालयात पाठवला.
विशेष म्हणजे, ज्याप्रमाणे आज शनिवारी, राजेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याची पत्नी मंगला हिचा देखील मृतदेह दोन वर्षांपूर्वी असाच पडून होता. राजेशने तिची हत्या केल्याच्या आरोपावरून २०१६ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला कारागृहात डांबल्यानंतर मंगला हत्याकांडाची सुनावणी न्यायालयात सुरू झाली. या प्रकरणात बहुतांश साक्षीदार मंगला आणि राजेशचे नातेवाईकच होते. तरीदेखील अनेकांनी सुनावणीदरम्यान विसंगत बयाण दिले. दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातून बाहेर आला होता. तो दुपारी त्याच्या घरात झोपला असावा, त्याच अवस्थेत त्याची गळा कापून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या हत्याकांडात त्याच्या किंवा मंगलाच्या नातेवाईकांपैकीच कुणी असावे, असा पोलिसांचा कयास आहे. तूर्त कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.