बहिणीला त्रास देणाऱ्या तडीपार गुंडाचा नागपुरात खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 08:19 PM2020-10-19T20:19:01+5:302020-10-19T20:20:45+5:30
Murder,crime News, Nagpur बहिणीला त्रास देत असल्यामुळे संतप्त झालेल्या एका गुन्हेगाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने तडीपार गुंडाचा खून केला. ही घटना रविवारी रात्री कपिलनगर ठाण्याच्या परिसरात घडली. उत्तर नागपुरात एका तासात खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीला त्रास देत असल्यामुळे संतप्त झालेल्या एका गुन्हेगाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने तडीपार गुंडाचा खून केला. ही घटना रविवारी रात्री कपिलनगर ठाण्याच्या परिसरात घडली. उत्तर नागपुरात एका तासात खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.
दीपक ऊर्फ गोलू देशराज राजपूत (२६) रा. कडू ले-आऊट असे मृत तडीपाराचे नाव आहे. तर तुषार सुनील गजभिये (२४) रा. तक्षशिलानगर आणि प्रेमचंद ऊर्फ टोनी मारोतकर (२३) रा. स्वामीनगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोलू उत्तर नागपुरातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला वर्षभरापूर्वी जरीपटका ठाण्याच्या परिसरातून तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो या परिसरात फिरत होता. त्याची परिसरात दहशत असल्यामुळे कुणीही पोलिसांना सूचना देत नव्हते. आरोपी तुषार आणि टोनी हेसुद्धा गुन्हेगार आहेत. त्यांची गोलूशी मैत्री होती. त्यामुळे गोलूची तुषारच्या बहिणीवर नजर गेली. काही दिवसांपासून गोलू तुषारच्या बहिणीला त्रास देत होता. याची माहिती मिळाल्यानंतर तुषार आणि टोनीने गोलूला अनेकदा समज दिली. परंतु गोलू ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे तुषार आणि टोनी संतप्त झाले. त्यांनी गोलूचा खून करण्याचे ठरविले. त्यांनी गोलूला आपल्या योजनेबाबत माहीत होऊ दिले नाही. योजनेनुसार आरोपींनी गोलूला पार्टी करण्यासाठी जाऊ असे सांगितले. ते गोलूला उप्पलवाडी वीटभट्टी परिसरात घेऊन गेले. तेथे चाकूने मानेवर आणि खांद्यावर वार करून त्याचा खून केला. तुषारने या घटनेची सूचना कपिलनगर ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला दिली. पोलिसांनी तुषारला अटक करून चौकशी केली. त्यानंतर उप्पलवाडी येथून गोलूचा मतदेह रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तुषार आणि टोनीला अटक केली आहे. कपिलनगर ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. ठाण्यातील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांसोबत ताळमेळ नसल्याने अशा घटना घडत आहेत.
राजूचे कुटुंब झाले उद्ध्वस्त
क्षुल्लक कारणावरून रविवारी रात्री यशोधरानगरच्या जोशीवाडीत झालेल्या राजू रंभाडच्या खुनामुळे त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. राजूचा एका अल्पवयीन गुन्हेगाराने आपला साथीदार शुभम वंजारीच्या मदतीने खून केला होता. राजू त्याला पत्ता विचारत असलेल्या दोन युवकांसोबत रस्त्यावर बोलत होता. त्यावेळी स्कुटीवर आलेल्या आरोपींनी राजूला बाजूला होण्यास सांगितले. तो बाजूला झाल्यानंतर आरोपी जात होते. स्कूटीचा धक्का लागल्यामुळे राजू त्यांच्यावर ओरडला. त्यामुळे दोघांनी राजूचा खून केला. राजू मजुरी करीत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन वर्षाची मुलगी रिधिमा आणि चार वर्षाची रिमा आहे. राजूच्या खुनामुळे पत्नी आणि मुलींच्या दोन वेळच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.