घराबाहेर गेला तो परतलाच नाही.. शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 11:23 AM2021-12-31T11:23:01+5:302021-12-31T11:50:48+5:30
उदालत हा मंगळवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास काही काम असल्याचे सांगत घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. दोन दिवसानंतर शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.
नागपूर : शेती विक्रीच्या व्यवहारातून सुरू झालेला पैशांचा वाद अखेरीस शिगेला पोहोचला. यातूनच एका ३५ वर्षीय शेतकऱ्याचा खून झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील सालेभट्टी (चोर) येथे उजेडात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य दोन जण संशयाच्या चौकटीत आहेत.
सुनील यादव ढगे व अनिल यादव ढगे दोन्ही रा. सालेभट्टी (चोर) अशी आरोपींची नावे आहेत. तर उदालत यादव झोडापे (३५) रा. सालेभट्टी (चोर) असे मृताचे नाव आहे. मृतक हा विवाहीत असून, पत्नी सोडून गेल्यामुळे तो वृध्द आई - वडिलांसोबत गावातच वास्तव्यास होता. प्राप्त माहितीनुसार उदालत हा मंगळवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास काही काम असल्याचे सांगत घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही.
नातेवाईकांकडे गावाला गेला असेल, असे समजून वयोवृध्द आई - वडिलांनीही फारसे गांभीर्याने घेतले नाही. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग वांढरे हा शेतकरी शेतात जात असताना, त्यांना खुशाब झोडापे यांच्या शेतात मृतदेह आढळला. याबाबत त्यांनी पोलीसपाटील विकास वांढरे यांना सांगितले. माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांनी पोलिसांसह घटनास्थळ गाठले. यावेळी शेतात पडलेला उदालतचा चेहरा काळसर पडलेला होता, तर गळ्याला नॉयलानची दोरी बांधलेली होती. एकंदरीत घटनास्थळावरील परिस्थिती खूनसदृश असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर लागलीच गावातील दोन आरोपींसह अन्य एकाला संशयाच्या आधारावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच यातील सुनील व अनिल या दोन भावंडांनी गुन्हा कबूल केला. मृतक उदालतची वयोवृध्द आई सुमन यादव झोडापे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ३०२ व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
शेतीच्या या सौद्यात आरोपी मध्यस्थी म्हणून होते. मात्र, ठरल्याप्रमाणे शेतीचे पैसे मिळाले नाहीत, या कारणावरुन उदालत व सौद्यात मध्यस्थाची भूमिका वठविलेल्या आरोपी ढगे बंधूंमध्ये वादविवाद सुरू होते.
आरोपी महिला सरपंचाचा पती
या प्रकरणात पोलिसांनी तू्र्तास दोन आरोपींना अटक केली आहे. यातील सुनील यादव ढगे हा सालेभट्टी (चोर) ग्रामपंचायत महिला सरपंचाचा पती आहे. उदालत याची आई सुमन यादव झोडापे हिने तक्रारीत आरोपी म्हणून गावातीलच चार जणांच्या नावांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.