ओली पार्टी जीवावर बेतली; दारूच्या वादातून मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 09:15 PM2021-12-28T21:15:29+5:302021-12-28T21:15:51+5:30
Nagpur News शेतात ओली पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये दारू पिण्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि सात जणांपैकी काहींनी एकाच्या पाेटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
नागपूर : शेतात ओली पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये दारू पिण्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि सात जणांपैकी काहींनी एकाच्या पाेटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पाेलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव शिवारात साेमवारी (दि. २७) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
धीरज ज्ञानेश्वर माकोडे (२४, रा. गुमगाव, ता. हिंगणा) असे मृताचे नाव असून, त्याच्या खूनप्रकरणात पाेलिसांनी धीरज रामानूज मिश्रा (२४), स्वप्नील नारायण डेकाटे (२५), श्रीराम लक्ष्मण ढोले (३६), कृष्णा अशोक मेंडुले (२६), जितेंद्र पितांबर ढोले (३५, सर्व रा. गुमगाव, ता. हिंगणा) व राजकुमार मारोती डेरकर (२७, रा. सातगाव, ता. हिंगणा) यांना ताब्यात घेतले असून, मंगेश टोंगे असे फरार आराेपीचे नाव आहे.
सर्व जण मित्र असून, त्यांनी गुमगावपासून दाेन किमीवर असलेल्या एका शेतात पार्टी ठेवली हाेती. धीरज कामानिमित्त बुटीबाेरीला गेला हाेता, तर सर्व जण दारू व मटण घेऊन शेतात गेले हाेते. त्यांनी शेतात जेवण तयार करण्यासाेबतच दारू प्यायला सुरुवात केली. धीरज उशिरा पाेहाेचल्याने त्याच्यासाठी फार थाेडी दारू शिल्लक राहिली हाेती. शिल्लक दारू मंगेश पीत असल्याने धीरजने त्याच्याकडे दारू मागितली.
याच कारणावरून दाेघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. मंगेशने धीरजच्या पाेटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि त्याने तिथून लगेच पळ काढला. यात धीरज गंभीर जखमी झाला हाेता. हा प्रकार घडताच स्वप्नील डेकाटे व राजकुमार डेरकर हे दाेघेही घटनास्थळाहून पळून गेले. तिघांनी जखमी धीरजला रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घाेषित केले.
माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी व सहाय्यक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करीत आढावा घेतला. फरार आराेपी मंगेशला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास ठाणेदार बळीराम परदेशी यांनी व्यक्त केला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदविला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कुथे व उपनिरीक्षक अमृता सोमवंशी तपास करीत आहेत.
...