नागपुरात सराईत गुन्हेगाराने केली कचरा वेचणाऱ्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 08:56 PM2019-04-01T20:56:06+5:302019-04-01T20:57:32+5:30
दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने कचरा वेचणाऱ्याची निर्घृृण हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने कचरा वेचणाऱ्याची निर्घृृण हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही थरारक घटना घडली. दिलीप ऊर्फ टोयक्या सदाशिव धनविजय (वय ५५) असे मृताचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव हर्षल प्रदीप चौधरी (वय २८) असून तो खामल्यात राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मृत दिलीप सोनवाडा (ता. भिवापूर) येथील मूळ रहिवासी होता. कचरा वेचून पोटाची खळगी भरणारा दिलीप खामल्यातील विकास पब्लिक स्कूलच्या बाजूच्या रेल्वेलाईनलगत झोपडपट्टीत राहात होता. आरोपी हर्षल चौधरी सराईत गुन्हेगार आहे. दारूचे व्यसन असलेला हर्षल चोऱ्या करून किंवा कुणाला धाकदपट करून पैसे मिळवत होता. कचरा वेचणाºया दिलीपसोबत त्याची मैत्री होती. अनेकदा दिलीपच्या कमाईवर हर्षल आपले दारूचे व्यसन भागवित होता. रोज रात्री ते दोघे अंधाºया ठिकाणी बसून दारू प्यायचे. रविवारी रात्री असेच झाले. ते दारू पीत बसले आणि त्यांच्यात अचानक वाद सुरू झाला. दारूच्या नशेत असल्याने शिवीगाळ करणाºया या दोघांनी वाद टोकाला गेल्यानंतर एकमेकांना मारहाण सुरू केली. गुन्हेगारी वृत्तीच्या हर्षलपुढे दिलीप कमी पडला. हर्षलने त्याला लाथाबुक्क्यांनी मारून जमिनीवर लोळवल्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले. त्यामुळे दिलीपचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. रात्रीची वेळ आणि अंधार असल्याने ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही.
सोमवारी सकाळी या भागात कार स्वच्छ करण्यासाठी आलेला सुबोध नवनागे लघुशंकेसाठी गेला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात दिलीपचा मृतदेह पडून दिसल्याने त्याने आरडाओरड करून बाजूच्यांना ही माहती दिली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. माहिती कळताच सोनेगावचा पोलीस ताफा पोहचला. कचरा वेचण्याच्या बहाण्याने दिलीप या भागात नेहमीच फिरत असल्यामुळे त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. दिलीपसोबत रात्री हर्षल होता, अशी माहितीही अनेकांनी पोलिसांना दिली. हर्षल सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांना त्याचा पत्ता माहीत होता. काही वेळातच हर्षलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. पहिल्या फटक्यातच त्याने दिलीपच्या हत्येची कबुली दिली.
शिव्या दिल्या म्हणून मारले !
आरोपी हर्षलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला हत्येचे कारण विचारले. यावर बोलताना दिलीपने आईच्या घाणेरड्या शिव्या दिल्याने त्याची हत्या केल्याचे सांगितले. हत्येनंतर आरोपी हर्षलने दिलीपजवळचे पैसेही लुटून नेल्याची शंका आहे. सुबोध नीळकंठ नवनागे (वय २९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षलविरुद्ध हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी हर्षलने दोन वर्षांपूर्वीसुद्धा एक हत्या केली असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल असल्याचे पोलीस सांगतात.