नागपुरात घरगुती वादातून आजोबाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:10 AM2019-03-08T00:10:40+5:302019-03-08T00:13:43+5:30
घरगुती वादातून एका तरुणाने त्याच्या आजोबाची चाकूचे घाव घालून निर्घृण हत्या केली. गुरुवारी दुपारी मेयो चौकाजवळच्या भोईपुरा, मच्छिमार्केट जवळ ही थरारक घटना घडली. किसन पुरणलाल शाहू (वय ६५) असे मृताचे नाव असून, त्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून आरोपी ब्रजेश परसराम गौर (वय २३) तसेच त्याची आजी गणेशिया लखन शाहू (वय ६०) या दोघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती वादातून एका तरुणाने त्याच्या आजोबाची चाकूचे घाव घालून निर्घृण हत्या केली. गुरुवारी दुपारी मेयो चौकाजवळच्या भोईपुरा, मच्छिमार्केट जवळ ही थरारक घटना घडली. किसन पुरणलाल शाहू (वय ६५) असे मृताचे नाव असून, त्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून आरोपी ब्रजेश परसराम गौर (वय २३) तसेच त्याची आजी गणेशिया लखन शाहू (वय ६०) या दोघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.
मृत किसन आणि आरोपी गणेशिया हे दोघे दीर भावजय होत. गणेशियाचा पती लखन आणि मृत किसन भाऊ होते. तर, आरोपी ब्रजेश हा गणेशियाच्या मुलीचा मुलगा (नातू) होय. गणेशीया भोईपुऱ्यात वडिलोपार्जित घरात राहत होती. तिच्याजवळच आरोपी ब्रजेश आणि त्याचा भाऊ सुमित राहायचे. याच घराच्या एका भागात मृत किसन त्यांच्या ममता आणि सुषमा नामक दोन मुलींसह राहत होते. किसन यांची बहीण विमलाबाई अत्यंत गरीब असल्यामुळे किसन यांनी तिला तिच्या मुलासह बोलवून घेत याच घराच्या वरच्या माळ्यावर राहण्याची व्यवस्था करून दिली होती.
विमलाबाईला या घरात जागा दिल्याने किसन यांची भावजय गणेशीया तसेच तिचा नातू ब्रजेश कमालीचे संतप्त झाले होते. ते याच कारणावरून वारंवार विमलाबाई आणि किसन यांच्याशी वाद घालायचे. मासे विकून उदरनिर्वाह करणारे किसन त्याच्या भावजयीच्या तसेच नातवाच्या कटकटीकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे या आजी-नातवाची हिंमत चांगलीच वाढली होती. त्याचमुळे ते किसन आणि विमलाबाईला ते मारहाणही करीत होते. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास असेच झाले.
आरोपी ब्रजेश वरच्या माळ्यावर जाऊन त्याची आत्या विमलाबाईसोबत वाद घालू लागला. त्याने चाकू काढल्यामुळे घाबरलेली विमलाबाई मदतीसाठी आरडाओरड करू लागली. तिने आरोपी ब्रजेशला धक्का मारून खाली पळ काढला तर, तिचा पाठलाग करीत आरोपी खाली आला. तेथे किसन यांनी बहीण विमलाबाईला आपल्या मागे घेतले आणि आरोपी ब्रजेशला त्यांनी समजावण्याचे प्रयत्न केले.
दुसरीकडे विमलाबाई आणि बाजूची एक महिला आरडाओरड करीत पोलीस चौकीकडे निघाल्या. त्यामुळे त्वेषात आलेल्या आरोपी ब्रजेशने वृद्ध किसनलाल यांना खाली पाडून तसेच फरफटत रस्त्यावर आणले आणि त्याच्या छातीत चाकू भोसकला. ते पाहून त्याचा आतेभाऊ सन्नी आणि बाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपी ब्रजेशला पकडले. इकडे किसनलाल यांची मुलगी ममताने वडिलांच्या छातीत फसलेला चाकू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते शक्य न झाल्याने बाजूच्यांच्या मदतीने त्यांना मेयोत पोहचवले. तेथे डॉक्टरांनी किसनलाल यांना मृत घोषित केले. दरम्यान, विमलाबाईने दिलेल्या माहितीवरून गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आरोपी ब्रजेशची परिसरातील मंडळींनी बेदम धुलाई केली होती. जमावाच्या तावडीतून पोलिसांनी ब्रजेशला ताब्यात घेतले. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला कसेबसे शांत केले.
आजीनेच दिली चिथावणी
सरळसाध्या स्वभावाच्या किसनलाल यांची हत्या करण्यासाठी आरोपी ब्रजेशला त्याची आजी गणेशिया शाहूने चिथावणी दिली. तो जेव्हा चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करीत होता त्यावेळी आरोपी आजी त्याला ‘सोडू नको, चाकूचे घाव घालून ठार मार’ अशी चिथावणी देत होती. तिच्या चिथावणीमुळेच आरोपी ब्रजेशने उजवा हात फ्रॅक्चर असूनदेखील डाव्या हाताने किसनलाल यांच्या छातीवर चाकूचे घाव घातले. परिसरातील नागरिकांनी ही माहिती दिल्यामुळे पोलिसांनी किसनलाल याच्या हत्या प्रकरणात आरोपी ब्रजेशसोबत गणेशियालाही अटक केली.