अनैतिक संबंधातून हत्या, आरोपींची जन्मठेप कायम
By admin | Published: December 30, 2016 02:31 AM2016-12-30T02:31:53+5:302016-12-30T02:31:53+5:30
चारित्र्यहीन पत्नी व तिच्या प्रियकराची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
हायकोर्ट : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले
नागपूर : चारित्र्यहीन पत्नी व तिच्या प्रियकराची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शीला रवींद्र निब्रड (२८) व राजू मारोती वासेकर (२८) अशी आरोपींची नावे असून ते कृष्णापूर, ता. वणी येथील रहिवासी आहेत. आरोपी शीलाला दोन मुले आहेत. एक मुलगा घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. ही घटना २२ फेब्रुवारी २०१३ रोजीच्या रात्रीची आहे. भोजन झाल्यानंतर मयत रवींद्र व मुले झोपायला गेली. दरम्यान, शीला घराबाहेर गेली. काही वेळानंतर ती आरोपी राजूसोबत घरात आली. शीलाने रवींद्रच्या चेहऱ्यावर काळी चादर टाकली व राजूने धारदार चाकूने रवींद्रला भोसकले. परिणामी रवींद्रचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी रवींद्रचा मृतदेह उचलून घराबाहेर ठेवला. शीलाने आरडाओरड करून अज्ञात व्यक्तीने रवींद्रची हत्या केल्याचे चित्र निर्माण केला. परंतु, आरोपींचा गुन्हा जास्त काळ लपला नाही. मुलाच्या बयानामुळे आरोपींचा भंडाफोड झाला. आरोपींनी मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घटनेची माहिती कोणालाही सांगू नको असे बजावले होते.
२९ नोव्हेंबर २०१४ रोजी केळापूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास यासह विविध कलमांतर्गत विविध शिक्षा सुनावली. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व इंदिरा जैन यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. शिरपूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपींतर्फे अॅड. आर. डी. धांडे तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)