२४ तासांपूर्वी मार खाल्ला अन् जीव घेऊन बदला चुकविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 05:18 PM2021-09-29T17:18:36+5:302021-09-29T21:06:21+5:30
Nagpur News दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर दोघांनी त्यांच्यासोबत दारू पीत बसलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४.१५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - २४ तासांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला चुकविण्यासाठी दोघांनी एका गुन्हेगाराची चाकूने भोसकून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४.१५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. आकाश मातादीन मोरे (वय २२) असे मृताचे नाव आहे.
तो आरटीओ कार्यालयाजवळ (डिप्टी सिग्नल परिसर) आदिवासी प्रकाशनगरात राहत होता. गुन्हेगारी वृत्तीच्या आकाशचे स्वताच्या आईसोबतही पटत नव्हते. त्याला सर्वच प्रकारच्या अंमली पदार्थांचे व्यसन होते. नशेत तो कुणालाही मारहाण करायचा. याच वस्तीतील आरोपी विक्की उर्फ विशाल नागेंद्र आणि रोहित बहादुरसिंग लहरी उर्फ देशमुख या दोघांसोबत मंगळवारी आकाशचा वाद झाला होता. यावेळी आकाशने नागेंद्र आणि लहरीला कंबरपट्ट्याने (बेल्टने) बेदम मारहाण केली होती. सर्वांसमोर झालेल्या अपमाणामुळे आरोपींनी आकाशला गंभीर परिणामाची धमकीही दिली होती. दरम्यान, नेहमीप्रमाणे आकाश त्याच्या काही साथीदारासह कळमना उड्डाणपुलाखाली जुगार खेळत बसला. यावेळी तो नशेत होता. दुपारी ४.१५ च्या सुमारास मागून नागेंद्र आणि लहरी आले. त्यांनी आकाश याच्यावर चाकूहल्ला चढवला. त्यानंतर बाजुच्या पटरीवरून ते पळून गेले. दरम्यान, तेथे जुगार खेळत बसलेली तसेच आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. आकाशला त्यांनी मेयोत नेले तेथे काही वेळेतच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर आदिवासीनगरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि आरोपींची शोधाशोध सुरू होती.
उपचारात झाला विलंब
आरोपींनी आकाशला चाकूने भोसकल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्याऐवजी आजूबाजूची मंडळी बराच वेळ नुसताच हो-हल्ला करीत राहिली. १५ ते २० मिनिट निघून गेल्याने आकाशचा बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याचा अखेर मृत्यू झाला.
लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
विशेष म्हणजे, आकाशची हत्या करण्यापूर्वी आरोपी विक्की उर्फ विशाल नागेंद्र आणि रोहित बहादुरसिंग लहरी उर्फ देशमुख यांनी नायट्रो-१० या नशा आणणाऱ्या गोळ्या खाल्ल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, रविवारी २६ सप्टेंबरच्या अंकात लोकमतने नागपुरातील गुन्हेगार हत्या करण्यापूर्वी ‘नायट्रो १०’ ची नशा करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या प्रकरणातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.