हिंगणा एमआयडीसी परिसरात कुख्यात गुंडाचा खून?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 03:25 PM2023-05-24T15:25:26+5:302023-05-24T15:26:42+5:30
अकस्मात मृत्यूची नाेंद : डाेके व गालावर जखमा
हिंगणा (नागपूर) : एमआयडीसी परिसरातील राजीवनगर (ता. हिंगणा) जवळ असलेल्या टेकडीवर मंगळवारी (दि. २३) सकाळी कुख्यात गुंडाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पाेलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नाेंद केली असली तरी त्याच्या डाेके व गालावरील जखमा विचारात घेता त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट हाेते.
चंदन शिवकुमार शाह (२२, रा. कार्तिकनगर-गजानननगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. चंदन हा कुख्यात गुंड असून, त्याच्या विराेधात गंभीर गुन्ह्यांच्या नाेंद असल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली. ताे जेवण आटाेपल्यानंतर साेमवारी (दि. २२) रात्री १० वाजताच्या सुमारास खर्रा खाण्यासाठी राजीवनगर परिसरातील पानटपरीवर आला हाेता, अशी माहिती पाेलिसांनी दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गजानननगर व राजीवनगरच्या मागच्या भागाला असलेल्या टेकडीवर त्याचा मृतदेह आढळून आला.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुकुंद कवाडे, उपनिरीक्षक संतोष रामलोड, विकास जाधव, सहायक फाैजदार नितीन जावळेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेचा सर्व दिशांनी तपास केला जात असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
गंभीर गुन्ह्यांची नाेंद
चंदनच्या विराेधात लूटमार, मारहाण, चाेऱ्या व तत्सम गंभीर गुन्ह्यांची पाेलिसांत नाेंद आहे. ताे लहानपणापासून गुन्हेगारांच्या टाेळीत वावरायचा. याच टेकडीवर सन २०११ मध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला हाेता. तीन ते चार जणांनी दगडांनी ठेचून त्या तरुणाचा खून केल्याचे तसेच त्या खुनात चंदन हा आराेपी असल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले हाेते. त्याच्या डाेके व गालावरील जखमी, रक्ताने माखलेला चेहरा विचारात घेता, त्याचा काही गुन्हेगारांनी आपसी वैमनस्यातून खून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.