नागपुरात चालले तरी काय ? ‘खुन्नस’ने पाहिले म्हणून केली तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 07:31 PM2022-05-10T19:31:19+5:302022-05-10T19:32:24+5:30
Nagpur News बारमध्ये बसलेले असताना ‘खुन्नस’ देत रागाने पाहिल्यावरून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नयी बस्ती येथे घडली.
नागपूर : बारमध्ये बसलेले असताना ‘खुन्नस’ देत रागाने पाहिल्यावरून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नयी बस्ती येथे घडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन दिवसांतील ही दुसरी हत्या आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारमध्ये मृतक सागर साहू हा मित्रांसोबत मद्यपान करत होता. त्याचवेळी समोरील टेबलवर आरोपी विल्सन पिल्ले व त्याचे मित्र देखील बसले होते. ऑटोचालक असलेला सागर व विल्सनचा जुना वाद होता. विल्सन हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, सागरने रागाने पाहिल्याचा आरोप करत विल्सन व त्याच्या सहकाऱ्यांनी बाचाबाचीला सुरुवात केली. वाद वाढू नये यासाठी सागर व त्याचा सहकारी बारबाहेर पडले. सागरने त्याच्या मित्राला घरी सोडले व तो परत नई बस्तीमध्ये आला. मागावर असलेल्या विल्सन व त्याच्या सहकाऱ्यांनी सागरला गाठले व रागाने का,पाहिले असे विचारत चाकूने त्याच्या मान व कंबरेवर सपासप वार केले. यामुळे तेथे खळबळ माजली. रक्ताच्या थारोळ्यातील सागरला त्याच्या मित्रांनी इस्पितळात नेले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती कळताच पोलिसांची चमू लगेच तेथे पोहोचली. या प्रकरणात आरोपी विल्सनला अटक करण्यात आली व विक्की बैसवारेल, हिमांशु उर्फ पिन्नी कनोजिया व आणखी एका फरार सहकाऱ्याचा शोध सुरू आहे.
जुन्या वादातून दुसरी हत्या
२४ तासांअगोदर गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंकुश तायवाडे नावाच्या गुन्हेगाराची देखील जुन्या वादातूनच हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याची हत्येत सूरज धापोडकर या तडीपार गुंड देखील सहभागी होता. शहरात ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी या घटनांवरून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कुटुंबियांना मोठा धक्का
सागरच्या कुटुंबात त्याचा जुळा भाऊ बादल, बहीण व आई-वडील आहेत. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्य करतात. सागर ऑटो चालवून कुटुंबाला हातभार लावत होता. तो घरातून निघाल्यावर त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.