पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; सिमेंटच्या गट्टूने ठेचले डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 04:30 PM2022-07-19T16:30:02+5:302022-07-19T16:35:18+5:30
पोलीस दीक्षितची पत्नी आणि इतर साथीदारांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत.
नागपूर : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने एका युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी सकाळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबाबुद्धनगर येथे घडली. दिवसाढवळ्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दीक्षित भगवान जनबंधू (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे, तर आसिफ अहमद खान (३२) असे मृताचे नाव आहे. दीक्षित आणि आसिफ एकाच वस्तीत राहतात. दीक्षित मॅक्सी चालवितो, तर आसिफ शाळेत चौकीदार होता. दीक्षितला आपल्या पत्नीशी आसिफचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळे दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वैमनस्य सुरू होते. वर्षभरापासून त्यांच्यातील वाद वाढला होता. दीक्षितने हल्ला करून आसिफला जखमी केले होते. आसिफच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी दीक्षित विरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. पाचपावली पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यामुळे दीक्षित संतप्त होता असे सांगण्यात येत आहे.
दीक्षितमुळे घाबरलेल्या आसिफने आपसात मतभेद दूर करण्याची तयारी दर्शवली होती; परंतु दीक्षित बदला घेण्यासाठी आतुर होता. सोमवारी सकाळी १० वाजता आसिफ दीक्षितच्या घराजवळ येऊन शिवीगाळ करू लागला. ते ऐकूृन दीक्षित तेथे आला. दोघांमध्ये वाद झाला. दीक्षितने आसिफला मारहाण केली. त्याने दगडाने डोके ठेचून आसिफचा खून केला. घटनेच्या वेळी वस्तीत वर्दळ होती. खुनाची घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पाचपावली पोलिसांनी आसिफचा मृतदेह मेडिकलमध्ये पोहोचविला. पोलिसांनी शोध घेऊन दीक्षितला अटक केली. दीक्षितने पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची शंका असल्यामुळे खून केल्याचे सांगितले. पोलीस दीक्षितची पत्नी आणि इतर साथीदारांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत.
पोलिसांनी घेतले नाही गांभीर्याने
दीक्षित विरुद्ध चोरी, हल्ला तसेच धमकी देण्यासह तीन गुन्हे दाखल आहेत. दीक्षितने आसिफवर यापूर्वी केलेला हल्ला पोलिसांनी गांभीर्याने घेतला असता तर ही घटना टळली असती. पाचपावली ठाण्याचा परिसर खुनाच्या घटनांमुळे नेहमीच बदनाम राहिला आहे. त्याचे परिणाम जुने ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोगावे लागले आहेत. तरीसुद्धा पोलिसांनी गांभीर्य न ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.