नागपुरात विधान भवनासमोर महिलेचा खून; शारीरिक अत्याचाराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 08:30 PM2022-07-25T20:30:44+5:302022-07-25T20:31:17+5:30

Nagpur News सिव्हिल लाइन्स येथील विधान भवनासमोर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भिकाऱ्याने एका मध्यमवयीन महिलेचे डोके जमिनीवर ठेचून खून केला. रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

Murder of woman in front of Vidhan Bhavan in Nagpur; Possibility of physical abuse | नागपुरात विधान भवनासमोर महिलेचा खून; शारीरिक अत्याचाराची शक्यता

नागपुरात विधान भवनासमोर महिलेचा खून; शारीरिक अत्याचाराची शक्यता

Next
ठळक मुद्देमारहाणीनंतर डोके जमिनीवर आदळले

नागपूर : सिव्हिल लाइन्स येथील विधान भवनासमोर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भिकाऱ्याने एका मध्यमवयीन महिलेचे डोके जमिनीवर ठेचून खून केला. रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विधान भवनासमोर झालेल्या खुनाच्या घटनेमुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कुशल ऊर्फ बाटा असे आरोपीचे नाव आहे.

मृत महिला ५५ वर्षांची असून, तिच्या मुलीचे लग्न झाले आहे. मीठा नीम दर्ग्याच्या परिसरात भीक मागून ती गुजराण करत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय कुशल ऊर्फ बाटादेखील परिसरात भीक मागतो. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्यासुमारास ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. कुशलचा महिलेसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. कुशलने महिलेला बेदम मारहाण केली. पावसामुळे लोकांची ये-जा नव्हती. याचा फायदा घेत कुशलने महिलेचे डोके जमिनीवर आपटले. डोक्याच्या मागील बाजूस खोलवर जखम झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कुशलने महिलेचा मृतदेह काही अंतरावर ओढून नेला व मृतदेह फूटपाथवर टाकून पळून गेला. सोमवारी सकाळी आठ वाजता इतर भिकाऱ्यांना महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह दिसला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

विधान भवनासमोर महिलेच्या हत्येने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. उपायुक्त डॉ. संदीप पखाले, सदरचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी घटनास्थळी पोहोचले. विधान भवनासमोरील एका शोरूमजवळ महिला आणि आरोपी कुशलचे कपडे आणि चप्पल पडून होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामुळे कुशलने शोरूमजवळून महिलेला ओढून नेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून कुशलचा शोध सुरू केला. त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

महिलेची अवस्था पाहून कुशलने महिलेला वासनेची शिकार बनवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस याचा इन्कार करत असून, ते पोस्टमार्टमच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अज्ञात व्यक्तीला आरोपी दाखविण्यात आले आहे.

Web Title: Murder of woman in front of Vidhan Bhavan in Nagpur; Possibility of physical abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.