सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या?; सीबीआयने खुलासा करावा- गृहमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:25 AM2020-12-28T01:25:18+5:302020-12-28T07:01:48+5:30
सुशांतसिंगची हत्या झाल्याची शंका व्यक्त करून मोठा गदारोळ उठविण्यात आला होता.
नागपूर : सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयने तातडीने जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली.
रविवारी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. सुशांतसिंगची हत्या झाल्याची शंका व्यक्त करून मोठा गदारोळ उठविण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली. आता त्याला पाच ते सहा महिन्यांचा अवधी झाला आहे. गृहमंत्री म्हणून आपल्याला ठिकठिकाणची मंडळी सुशांतसिंग प्रकरणात प्रश्न विचारतात.
सुशांतची हत्या की आत्महत्या, असा प्रश्न करतात. त्यामुळे माझी सीबीआयकडे मागणी आहे की, त्यांनी सुशांतसिंगची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, यासंबंधीचा चौकशी अहवाल तातडीने सादर करावा. सीबीआयने चौकशी अहवाल जाहीर केल्यास जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.