हत्या की आत्महत्या? तरुण-तरुणीचा दुरांतो एक्स्प्रेसने कटून मृत्यू
By जितेंद्र ढवळे | Published: September 1, 2022 09:12 PM2022-09-01T21:12:49+5:302022-09-01T21:14:26+5:30
हत्या की आत्महत्या? कारण गुलदस्त्यात, पोलिस तपास सुरू
नागपूर (हिंगणा) : नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर दुरांतो एक्स्प्रेसखाली कटून तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. गुमगाव ते खापरी परिसरातील संदेश सिटी परिसरात गुरुवारी ही घटना घडली. मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाही. याशिवाय ही घटना हत्या की आत्महत्या आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, हिंगणा पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मुंबईवरून नागपूरच्या दिशेने डाऊन ट्रॅकवर येणाऱ्या १२२८९ क्रमांकाच्या दुरांतो एक्स्प्रेससमोर अचानक रेल्वे रुळावर अंदाजे २०-२२ वर्षे वयाची तरुणी व अंदाजे २५ वर्षे वयाचा तरुण हे दोघेही आले. गाडीचा वेग जास्त असल्याने दोघांनाही सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत रेल्वेने फरफटत नेले. यात दोघांचेही शरीर चेंदामेंदा झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस व हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे, सहायक पोलीस निरीक्षक कुथे, सहायक पोलीस निरीक्षक डी.के. वाघ, अजय बरडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.