नागपुरात ‘कौन बनेगा करोडपती’च्या फोनमुळे हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:07 PM2020-09-19T22:07:46+5:302020-09-19T22:09:00+5:30

केबीसीच्या फेक कॉलमुळे वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी यश मधुकर ठाकरे या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Murder over 'Kaun Banega Crorepati' phone in Nagpur | नागपुरात ‘कौन बनेगा करोडपती’च्या फोनमुळे हत्या

नागपुरात ‘कौन बनेगा करोडपती’च्या फोनमुळे हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केबीसीच्या फेक कॉलमुळे वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी यश मधुकर ठाकरे या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आरोपी इम्तियाज अली मुक्तार अली (वय २१) आणि शेख असीम शेख रशीद (वय २४, रा. गौसिया कॉलनी, हुडकेश्वर) या दोघांच्या अटकेनंतर त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यश मधुकर ठाकरे हा १९ वर्षाचा युवक हुडकेश्वर झोपडपट्टीत राहत होता. आरोपी इम्तियाज आणि असीम हे दोघे यश ठाकरेचे मित्र होते. ते तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे होते. त्यांना दारू आणि अमली पदार्थाचे व्यसन होते. त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी लुटमारीचा गुन्हा केला होता. त्यात पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हे तिघे सोबत राहायचे आणि व्यसन करायचे.
चार दिवसांपासून यश ठाकरेला ‘कौन बनेगा करोडपती’मधून मोबाईलवर कॉल येत होते. तू आता लवकरच करोडपती बनणार आहे, असे हे फेक कॉल करणारे त्याला सांगत होते. फारशी जाण नसल्यामुळे त्यालाही करोडपती होण्याचा गैरसमज झाला होता. ठाकरेने ही माहिती इम्तियाज आणि असिमला सांगितली होती. यामुळे आरोपींनी त्याला करोडपती झाल्यानंतर त्यातील रक्कम आम्हालाही द्यावी लागेल, असे म्हटले होते. ठाकरे मात्र एक पैसा मिळणार नाही, असे ठणकावून सांगत होता. त्यातून त्यांच्यात गुरुवारी कडाक्याचा वाद झाला होता. ठाकरे बेईमानी करीत असल्याची भावना आरोपींची झाली होती. त्यामुळे त्याला धडा शिकविण्यासाठी आरोपींनी कट रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी इम्तियाज आणि असीमने त्याला शुक्रवारी सायंकाळी वाठोड्यातील सेनापती जवळच्या मोकळ्या मैदानात नेले. सोबत दारूची बॉटल आणि गांजाच्या गोळ्या नेल्या. नशा करीत असताना त्यांच्यात करोडपतीचा मुद्दा निघाला. आम्हाला त्यातून हिस्सेवाटणी लागेल, असे आरोपींनी म्हणताच ठाकरेने नकार देऊन जवळ असलेला चाकू काढला. त्यामुळे आधीच तयारीत असलेल्या आरोपींनी ठाकरेजवळचा चाकू हिसकावून घेत त्याच्यावरच सपासप घाव घातले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले.
दरम्यान, माहिती कळताच वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांनीही आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेथून माहिती घेतल्यानंतर ठाकरेसोबत नेहमी दिसणारे इम्तियाज आणि असीम तेथे नसल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची शोधाशोध सुरू केली. मध्यरात्री हे दोघे मोमिनपुºयातील बकरामंडीजवळ लपून असल्याचे खबºयाकडून कळताच पोलिसांनी तेथे जाऊन त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि ठाकरेला कौन बनेगा करोडपती (केबीसी) मधून फोन येत होते. तो करोडपती बनणार होता मात्र आम्हाला त्याने एकही पैसा देण्यास नकार दिल्यामुळे त्याची हत्या केल्याचे सांगितले. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने इम्तियाज आणि असीमला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

२४ पर्यंत पीसीआर मंजूर वाठोडा
पोलिसांनी या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयातून त्यांचा २४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

यशोधरानगरात दारूविक्रेत्याने केली हत्या
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील ले-आऊटमध्ये राहणारा सुबोध ऊर्फ बापू विशाल मेश्राम याची अवैध दारूविक्रेत्याने साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने हत्या केली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
प्रणय ऊर्फ गोलू राऊत, सागर परिमल आणि त्यांचे दोन साथीदार या प्रकरणात आरोपी आहेत.
आरोपी राऊत हा अवैध दारूविक्री करतो. साथीदारांसोबत गुंडगिरीही करतो. सुबोध मेश्राम त्याच्या गुत्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री दारू प्यायला गेला. आरोपी राऊत आणि परिमलसोबत त्याचा यावेळी वाद झाला. त्यानंतर हे दोघे आणि त्याचे दोन साथीदार अशा चौघांनी सुबोध मेश्राम याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला ठार मारले. विशाल गंगाधर मेश्राम यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

सात तासात २ हत्या
अवघ्या सात तासाच्या कालावधीत हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder over 'Kaun Banega Crorepati' phone in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.