नागपुरातील पेट्रोलपंपावरील हत्या, दरोड्याचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:17 PM2020-05-22T21:17:50+5:302020-05-22T21:24:07+5:30
हिंगणा एमआयडीतील आऊटर रिंग रोड वर असलेल्या पेट्रोल पंपावरच्या एका वृद्ध कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी केल्यानंतर एक लाख रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या आरोपींचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणा एमआयडीतील आऊटर रिंग रोड वर असलेल्या पेट्रोल पंपावरच्या एका वृद्ध कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी केल्यानंतर एक लाख रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या आरोपींचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींसह पाच जणांना ताब्यात घेतले. मात्र या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुन्हेगार सागर बावरी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संजय उगले यांच्या मालकीच्या विद्या सर्वो पेट्रोल पंपावर गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार बावरी आपल्या पाच साथीदारांसह कुऱ्हाड, चाकू, रॉड घेऊन पोहचला. गाढ झोपेत असलेले पेट्रोल पंपावरचे कर्मचार पंढरी श्रीरामजी भांडारकर (वय ६१, रा. वैभवनगरी, वानाडोंगरी) आणि लीलाधर मारोतराव गोहते ( वय ५३, पूजा लेआऊट, जयताला) या दोघांवर कुऱ्हाडीने घाव घातले. भांडारकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोहते गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी भल्या सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.
माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनीही धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात पेट्रोल पंप संचालक संजय उगले यांची तक्रार नोंदवून हत्या करून दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल केला.
ठाणेदार खराबे यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवली या पेट्रोल पंपावर हिंगण्यातील खतरनाक गुन्हेगार बावरी हा येत होता, अशी माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याच्या घरी धाव घेतली. मात्र तो अक्षय जाधव नामक साथीदाराच्या घरी गेल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांनी तिकडे धाव घेतली. मात्र, तो जाधवच्या घरी आढळला नाही. पोलिसांनी जाधवला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्याला बोलते केले असता त्यांनी या थरार कांडाची कबुली दिली. सोबत या गुन्ह्यात कोण आणि किती आरोपी होते, त्याचीही माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी अन्य चार आरोपी ताब्यात घेतले. या सर्वांनी या दरोड्याचा कट कुख्यात बावरी यानेच रचल्याचे सांगून त्यांनीच दोघांची हत्या केली आणि रक्कम घेऊन तो पळून गेल्याचे सांगितले. पोलीस बावरीचा शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी
अक्षय शालिक जाधव (वय १९, रा. बनवाडी हिंगणा), अनिल रामसिंग पाल ( वय २४, रा. एमआयडीसी नागपूर) आणि तीन विधिसंघर्ष आरोपी. हत्या आणि दरोड्याच्या या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात छडा लावन्याची कामगिरी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे, उपनिरीक्षक नितीन मदनकर, देवानंद बगमारे, विकास जाधव, फौजदार अरविंद मोहोळ, विजय नेमाडे, दत्तराम काळे, शिपाई योगेश बहादुरे आणि आशिष दुबे यांनी बजावली.
दोन वर्षांपूर्वी केली होती प्राचार्य वानखेडेची हत्या
कुख्यात सागर बावरी याने दोन वर्षांपूर्वी नरेंद्र नगरातील प्राचार्य वानखेडे यांची कारागृह समोर हत्या केली होती. काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.