प्रॉपर्टी वादातून  हत्या, तीन आरोपी  ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 10:25 PM2020-12-17T22:25:00+5:302020-12-17T22:26:35+5:30

Murder, crime news प्रॉपर्टीच्या वादातून दोघांनी गुड्डू दुर्गाप्रसाद तिवारी (वय ४६) नामक व्यक्तीची शस्त्राचे घाव घालून निर्घृण हत्या केली. अत्यंत वर्दळीच्या कमाल चौकाजवळच्या शनिवार बाजारात गुरुवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली.

Murder in property dispute, three accused in custody | प्रॉपर्टी वादातून  हत्या, तीन आरोपी  ताब्यात

प्रॉपर्टी वादातून  हत्या, तीन आरोपी  ताब्यात

Next
ठळक मुद्देनागपूरच्या कमाल चौकात थरार 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - प्रॉपर्टीच्या वादातून दोघांनी गुड्डू दुर्गाप्रसाद तिवारी (वय ४६) नामक व्यक्तीची शस्त्राचे घाव घालून निर्घृण हत्या केली. अत्यंत वर्दळीच्या कमाल चौकाजवळच्या शनिवार बाजारात गुरुवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मोहसिन अहमद ऊर्फ पिंटू किल्लेदार आणि विवेक गोडबोले तसेच नीलेश सावंत पिल्लेवान या तीन आरोपींना ताब्यात घेतले. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा गुड्डू न्यायमंदिर परिसरात सायकल स्टॅण्ड चालवायचा. सध्या त्याचा भाऊ ते सांभाळतो. काही दिवसांपासून गुड्डू, पिंटू आणि विवेक हे तिघे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचे. पिंटू आणि विवेकचा जुना क्राईम रेकॉर्डही आहे. मनीषनगर बेलतरोडीत विवेक आणि गुड्डूचे आजूबाजूला भूखंड आहे. त्यावर गुड्डूच्या रेस्टॉरंटचे बांधकाम करण्याच्या मुद्यावरून त्यांच्यात दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती. बुधवारी रात्री त्यांच्यात वादही झाला होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी दुपारी १ वाजता गुड्डू , पिंटू आणि एक तरुणी असे तिघे एम्प्रेस मॉल चाैकात भेटले. तेथून गुड्डू आणि पिंटू कमाल चाैकात आले. तेव्हापासून ते शनिवार बाजारातील नीलेश पिल्लेवानच्या चायनीज सेंटरमध्ये (झोपड्यात) बसून खात-पीत होते. विवेकही तेथे आला. त्यांच्यात दोन अडीच तासांपासून कुरबूर सुरू होती. ती वाढतच गेली. दुपारी ४.१० ते ४.१५ च्या सुमारास गुड्डूने आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याने संतापलेल्या पिंटू आणि विवेकने त्याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. चायनीज सेंटरमधील भाजी कापण्याचा धारदार चाकू घेऊन गुड्डूवर आरोपींनी सपासप घाव घातले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले नंतर आरोपी बाजूच्या दुकानात जाऊन बसले. या प्रकारामुळे बाजारात प्रचंड थरार निर्माण झाला. अनेकांनी आपापले दुकान गुंडाळून तेथून पळ काढला. माहिती कळाल्यानंतर पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परिमंडळ तीनचे उपायुक्त लोहित मतानी हेसुद्धा तेथे पोहचले. त्यांनी घटनेची आणि आरोपीची माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांनी गुड्डूचा मृतदेह रुग्णालयात रवाना केला. काही वेळेतच पोलिसांनी लगेच पिंटू आणि विवेकला ताब्यात घेतले. ते दोघेही दारूच्या नशेत टून्न होते. गुड्डूने आईची शिवी दिल्याने रागाच्या भरात त्याला भोसकल्याचा कबुली जबाब आरोपींनी पोलिसांकडे दिल्याचे समजते.

तर टळली असती घटना

आरोपी आणि गुड्डूमध्ये दोन अडीच तासांपासून वाद सुरू होता. ते वारंवार हमरीतुमरीवर येत होते. यावेळी आजूबाजूला मोठी गर्दी होती. मात्र, कुणीही त्यांना समजावून दूर केले नाही. चायनीज सेंटर चालविणाऱ्या नीलेश पिल्लेवान याने किमान पोलिसांना फोन करून कळविले असते तरी हत्येचा हा गुन्हा टाळता आला असता. मात्र, समोर भांडण होत असतानाही नीलेश अथवा कुणीही तसे केले नाही. त्यामुळे गुड्डूची हत्या झाली. त्यामुळे पाचपावली पोलिसांनी या प्रकरणात नीलेश पिल्लेवान यालाही सहआरोपी केले आहे.

जुगारी, नशेडी आणि गुन्हेगारांची वर्दळ

ज्या ठिकाणी गुड्डूची हत्या झाली तेथे सर्रास सट्टा, अड्डा, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीही चालते. तेथेच अंडा, आमलेटही मिळते. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत दारुडे, नशेडी, जुगारी आणि गुन्हेगारांची वर्दळ असते. परिणामी नेहमीच तेथे छोटे मोठे वाद, भांडण होत असतात.

Web Title: Murder in property dispute, three accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.