साडेचारशे रुपयांसाठी झाला होता खून ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:10 AM2021-09-07T04:10:34+5:302021-09-07T04:10:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उधारीचे ४५० रुपये परत करण्यावरून भांडण झाले आणि या भांडणातच गुन्हेगार रमेश ऊर्फ काल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उधारीचे ४५० रुपये परत करण्यावरून भांडण झाले आणि या भांडणातच गुन्हेगार रमेश ऊर्फ काल्या डांगरेचा खून करण्यात आला. पारडी पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली असता त्यातून ही बाब उघडकीस आली.
रविवरी दुपारी महाजनपुरा येथील २६ वर्षीय काल्याचा त्याच्या घरीच खून करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात गोट्या दुरगुडे व पीयूष पंचबुद्धे याला अटक केली आहे. काल्याची गोट्यासोबत जुनी ओळख आहे. काही दिवसांपूवी गोट्याने काल्याकडून ४५० रुपये उधार घेतले होते. पैसे परत न केल्याने काल्या संतापला होता. काल्या आपल्य आजीसोबत महाजनपुऱ्यात राहत हाेता. त्याचे आई-वडील आपल्या दोन मुलांसोबत दुसरीकडे राहतात. रविवारी सकाळी त्याची आजी घराबाहेर गेली होती. काल्या घरी एकटाच होता. दुपारी १.३० वाजता तो आरोपींसोबत दारू पीत होता. दरम्यान पैशावरून त्याचा गोट्यासोबत वाद झाला. त्याचवेळी काल्याचे वडील नामदेव डांगरे तिथे पोहोचले. मुलगा दारू पिऊन वाद करीत असल्याचे पाहून ते तेथून निघून गेले. वडील गेल्यानंतर काल्याचा आरोपींसोबतचा वाद आणखी वाढला.
काल्याच्या विरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आपल्या जिवाला धोका होण्याची शक्यता लक्षात घेता आरोपींनी त्याची हत्या करण्याचे ठरवले. दुपारी ३.३० वाजता त्यांनी त्याच्या घरात घुसून त्याचा खून केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. तेव्हा काल्या व आरोपींमध्ये भांडण झाल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.