बहिणीच्या प्रियकराची हत्या

By Admin | Published: May 4, 2017 01:54 AM2017-05-04T01:54:07+5:302017-05-04T01:54:07+5:30

अजनीच्या आंबेडकरनगरात एका युवकाने वडील आणि साथीदारांच्या मदतीने आपल्या विवाहित बहिणीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना घडली.

Murder of sister lover | बहिणीच्या प्रियकराची हत्या

बहिणीच्या प्रियकराची हत्या

googlenewsNext

दोन मित्र जखमी : पिता-पुत्रासह पाच जणांना अटक
नागपूर : अजनीच्या आंबेडकरनगरात एका युवकाने वडील आणि साथीदारांच्या मदतीने आपल्या विवाहित बहिणीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना घडली. या घटनेत मृताचे दोन मित्रही जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे वस्तीत तणावाचे वातावरण असून पोलिसांनी पिता-पुत्रासह पाच आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीत बंटी सुखदेवे, त्याचे वडील मनोहर सुखदेवे, नयन इलमकर, अमोल शेंडे, योगेश उके यांचा समावेश आहे. हल्ल्यात मृत झालेल्यात पंकज रवींद्र पाटील (३०) याचा तर जखमीत स्वप्निल पाटील (२६) आंबेडकर नगर आणि पलाश वर्मा (३०) रामेश्वरी यांचा समावेश आहे. पंकज पाटील आॅटो चालवितो. खुनाचा सूत्रधार बंटी सुखदेवे त्याच्या शेजारी राहतो. पंकजच्या आईच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाचे बंटीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते.
दीड वर्षापूर्वी बंटीच्या बहिणीचे अमरावतीत लग्न झाले. तिच्या लग्नामुळे पंकजला दु:ख झाले.
त्याने १७ जून २०१६ रोजी बंटीच्या घरासमोर गोंधळ घातला होता. बंटीच्या बहिणीवर धोका दिल्याचा आरोप लावून त्याने धमकी दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पंकजविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद आणखीनच वाढला. बंटीची बहीण प्रसूतीसाठी माहेरी आली होती.
मंगळवारी बंटीच्या घरी नामकरण विधी होता. मंगळवारी रात्री अमरावती मार्गावर बंटीच्या जावयाच्या कारवर हल्ला करून कारच्या काचा फोडण्यात आल्या. बंटीला यात पंकजचा हात असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने त्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला.
नामकरण समारंभासाठी आलेले पाहुणे गेल्यानंतर रात्री १०.४५ वाजता बंटी, त्याचे वडील मनोहर सुखदेवे, साथीदार नयन इलमकर, अमोल शेंडे, योगेश यांनी पंकजवर हल्ला केला. त्यांनी पंकजला घराजवळच घेरले. पंकजसोबत स्वप्निल आणि पलाश होते. बंटी आणि त्याच्या साथीदारांनी तिघांनाही घेरून त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी पंकजच्या छातीत चाकू खुपसला. तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेमुळे वस्तीत खळबळ उडाली. तिघांनाही मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पंकजचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी खून तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तपास ठाणेदार शैलेश शंखे, सहायक पोलीस निरीक्षक धोबे करीत आहेत.(प्रतिनिधी)

 

Web Title: Murder of sister lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.