साडेतीनशे रुपयांसाठी हत्या : मित्रच बनला शत्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:02 AM2019-09-14T00:02:24+5:302019-09-14T00:03:15+5:30
अवघ्या साडेतीनशे रुपयांसाठी एका गुंडाने त्याच्या मित्राची निर्दयपणे हत्या करून मृतदेह झाकून ठेवला. एमआयडीसी परिसरात झालेल्या या हत्याकांडाचा तीन दिवसानंतर खुलासा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या साडेतीनशे रुपयांसाठी एका गुंडाने त्याच्या मित्राची निर्दयपणे हत्या करून मृतदेह झाकून ठेवला. एमआयडीसी परिसरात झालेल्या या हत्याकांडाचा तीन दिवसानंतर खुलासा झाला. रोशन राजेश नगराळे (वय १९, लोखंडेनगर) असे मृताचे नाव आहे. तर, त्याची हत्या करणाराचे नाव अजिंक्य राजेश तेलगोटे (वय १९) असून तो रमाबाई आंबेडकर नगरात राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
रोशनला आईवडील नाही. तो त्याच्या आजीकडे आपल्या छोट्या भावासह राहायचा. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. तर, त्याच्याशी मैत्री ठेवणारा अजिंक्य गुंड प्रवृत्तीचा आहे. तो गोरगरीब तरुणांकडून उधारीच्या नावाखाली रक्कम मागतो. दिली नाही तर त्यांच्याकडची रक्कम हिसकावून घेतो. अजिंक्यने रोशनकडून काही दिवसांपूर्वी ३५० रुपये उधार घेतले होते. रोशनने अजिंक्यला आपले पैसे परत मागितले. तो टाळाटाळ करीत असल्याने अजिंक्यने त्याच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. खुनशी वृत्तीच्या अजिंक्यने रोशनला अवघ्या ३५० रुपयांसाठी फोन करून तुझे पैसे घेऊन जा म्हणत संपविण्याचा कट रचला. मोहर्रम निमित्त ९ सप्टेंबरच्या रात्री रोशन त्याचा मित्र वैभव वाघाडेच्या घरी आला होता. यादरम्यान आरोपी अजिंक्यने रोशनला स्वत:कडे बोलवून घेतले. मात्र, तुला मी बोलविले हे कुणाला सांगू नको, असेही अजिंक्यने रोशनला सांगितले. सरळसाधा रोशन पैसे मिळणार म्हणून अजिंक्यकडे निघाला मात्र त्याने आपण अजिंक्यकडे जात आहो, ही माहिती मित्र वैभवला दिली. रोशन आल्यानंतर अजिंक्यने त्याला भरपूर दारू पाजली. नंतर त्याला जयताळा (एसआरपीएफ कॅम्प) परिसरात निर्जन ठिकाणी घेऊन गेला. अंधाऱ्या ठिकाणी नेऊन रोशनच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा जोरदार फटका हाणून रोशनची हत्या केल्यानंतर आरोपी अजिंक्यने त्याच्या मृतदेहावर चिखल-विटांचा मलबा टाकला. त्यानंतर त्याचा मोबाईल घेऊन पळ काढला.
दरम्यान, रोशन घरी परत न आल्यामुळे त्याची आजी, भाऊ आणि मित्रांनी त्याला शोधणे सुरू केले. वैभवला तो अजिंक्यकडे जातो, असे सांगून गेला होता. त्यामुळे सर्व आरोपी अजिंक्यच्या घरी पोहचले. त्याला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे रोशनच्या मित्रांनी त्याची बेदम धुलाई केली आणि प्रतापनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपी अजिंक्यला ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने रोशनची हत्या केल्याची कबुली देऊन लपवून ठेवलेला मृतदेह दाखवला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला.
निर्दयी अन् धूर्तही !
एका गरीब मित्राची अवघ्या साडेतीनशे रुपयांसाठी हत्या करणारा अजिंक्य निर्दयी अन् धूर्तही आहे. त्याने रोशनची हत्या केल्यानंतर त्याच्या आजीला फोन केला. आपण पोलीस बोलतो, रोशनला हिंगण्यातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटक करणार आहो. ते टाळायचे आहे तर पैसे द्यावे लागतील, असे म्हटले. रोशनच्या आजीने त्याला भेटून बोलू, असे म्हटले. त्यामुळे त्याने समोर येण्याचे टाळले.
कळमन्यातही हत्येचा प्रयत्न
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला. हल्लेखोर कोण आणि गंभीर जखमी झालेल्याचे नाव काय, त्याची माहिती वृत्त लिहिस्तोवर उपलब्ध झाली नाही.