नोकरी-संपत्तीच्या वादात झाला होता खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:33+5:302021-07-01T04:06:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सफाई कामगार असलेल्या सासूची नोकरी व संपत्ती मिळविण्यासाठी सुरू असलेल्या वादातूनच राजू सिंदुरिया याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सफाई कामगार असलेल्या सासूची नोकरी व संपत्ती मिळविण्यासाठी सुरू असलेल्या वादातूनच राजू सिंदुरिया याने साथीदारांच्या मदतीने मावस सासऱ्याचा खून केला होता. वाठोडा पोलिसांनी राजूसह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री वाठोडातील बिडगाव झोपडपट्टी येथे ४८ वर्षीय राजेश पन्नालाल यादव याचा खून झाला होता.
बीडगाव येथील रहिवासी भोला राणे मनपात सफाई कामगार आहे. आरोपी राजू सिंदुरिया आणि भोला या दोघांच्या पत्नी बहिणी आहेत. भोलाची सासू मनपात सफाई कामगार होती. तिला पतीच्या जागेवर नोकरी मिळाली होती. २९ मे रोजी तिचा मृत्यू झाला. राजू-भोला यांचा सासरा व साळा यांचा आधीच मृत्यू झाला आहे. परिवारात केवळ राजू-भोला यांच्या पत्नी आहेत. दोघांच्या पत्नी आईच्या जागेवर नोकरी मिळण्यासाठी इच्छुक होत्या. त्यामुळे दोघांच्याही पतीमध्ये वाद सुरू होता. नोकरीशिवाय सासूची संपत्ती व बँकेत जमा रकमेच्या वाटपावरूनही भांडण होते. गुन्हेगारांशी जुळले असल्याने दोघेही एकमेकांना धमकावत होते. भोलाने स्वत:च्या मदतीसाठी मावस सासरा राजेश यादव यालाही सोबत ठेवले होते.
सोमवारी रात्री राजू आपला साथीदार आकाश मेश्राम, रोहित उर्फ गाोलू नंदनवार आणि अन्य एका साथीदारासोबत शस्त्र घेऊन भोलाचा घरी गेला. राजू व त्याच्या साथीदारांनी भोलाच्या घरावर हल्ला केला. भोला व त्याची पत्नी घरात दडून बसले. त्यांचा मावस सासरा राजेश यादव आरोपींच्या हाती लागला. त्यांनी काठी व तलवारीने वार करून यादवला जखमी केले. घरात तोडफोड केली. यादवला रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. वाठोडा पोलिसांनी हत्या व दंग्याचा गुन्हा दाखल करीत, चार आरोपींना अटक केली. राजू पारडीला राहतो. तिथे अवैध दारूचा धंदा करीत होता. एका वर्षापूर्वीच तो बीडगावला आला होता.