पत्नी-मुलीची हत्या; पतीची आत्महत्या
By admin | Published: January 21, 2017 02:23 AM2017-01-21T02:23:33+5:302017-01-21T02:23:33+5:30
पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली.
गोरेघाट शिवारात आढळले मृतदेह : घातपाताची शक्यता
देवलापार : पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेघाट जंगलात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
ही हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मृतदेहाच्या पाहणीनंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पती बाळू कांतिलाल सांगोडे (३५), पत्नी रूपाली बाळू सांगोडे (३०) व मुलगी अंशू बाळू सांगोडे (अडीच वर्षे) रा. टुयापार, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. बाळू सांगोडे हा मध्य प्रदेशातील भरवेली (जिल्हा बालाघाट) येथील खाणीत आॅपरेटर म्हणून नोकरी करायचा. अंदाजे चार वर्षांपूर्वी त्याचे रूपालीसोबत लग्न झाले.
रूपालीचे माहेर मौदा तालुक्यातील असून, लग्नानंतर बाळू हा खाणीच्या क्वॉर्टरमध्ये पत्नीसह राहायचा. तो पत्नी रूपाली आणि अंशुला घेऊन गुरुवारी एमपी-५०एमसी-०९९६ क्रमांकाच्या मोटरसायकलने भरवेली येथून टुयापार येथे यायला निघाता होता. गोरेघाटनजीकच्या जंगलात त्याने धारदार शस्त्राने वार करून रूपाली आणि अंशुची हत्या केली आणि झाडाला गळफास बांधून स्वत: आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, रूपाली व अंशु यांचे मृतदेह जवळजवळ होते तर बाळून झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. जवळच मोटरसायकल, मोबाईल व कपड्यांची बॅग होती. रुपालीची मान कापलेली असून, ती केवळ मांसावर लटकलेली होती. बाळूचे हात मात्र बांधलेले होते. त्यामुळे परिसरात या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहेत. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.(प्रतिनिधी)
२९ पानांची सुसाईड नोट
मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली असून, ही २९ पानांची आहे. पत्नीचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे वारंवार खटके उडायचे. तिला समजावण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर तीन ते चार खोल्या बदलविल्या. परंतु, ती नवीन ठिकाणी अनैतिक संबंध प्रस्थापित करायची. ही नोट हिंदीत लिहिलेली असून, त्यात तीन-चार नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मी जे काही करत आहे, ते मला काही कळत नाही. कळले तरी मी लाचार आहो. तुला मारत आहो. मला माफ कर’ असे त्याने या नोटमध्ये मुलीला उद्देशून लिहिले आहे.