कुख्यात गुंडांनी केली तरुण कंत्राटदाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:38 PM2019-05-17T14:38:35+5:302019-05-17T14:40:37+5:30
कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. एक आठवड्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. श्रीकांत हरिभाऊ वंजारी (वय ३१) असे मृताचे नाव असून, आरोपींची नावे शैलेष केदारे आणि आकाश उर्फ विक्की भोसले अशी आहे. केदारे हा गँगस्टर संतोष आंबेकर याचा भाचा होय.
हुडकेश्वर हद्यीत नरसाळा मार्गावर दुर्गेश नंदिनी नगर आहे. तेथे श्रीकांत राहत होता. तो बांधकाम तसेच इलेक्ट्रीकच्या कामाचे कंत्राट घ्यायचा. ८ मे च्या सकाळी ९.३० वाजता श्रीकांतने आपल्या आईकडे छाती दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या भावाने श्रीकांतच्या छातीला बाम चोळून दिला आणि तो तसेच त्याची आई घराबाहेर गेले. काही वेळेनंतर ते घरी परतले असता त्यांना श्रीकांत पलंगाखाली पडून दिसला. त्यांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी श्रीकांत वंजारीला मृत घोषित केले. या घटनेची सूचना मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, डॉक्टरांनी पोलिसांना शवविच्छेदन अहवाल दिल्यानंतर पोलीस चक्रावले. श्रीकांत वंजारीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले होते. त्यामुळे पोलिसांनी चौकशीची चक्र फिरवली. श्रीकांतने काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शैलेष केदारे (रा. इतवारी) आणि आकाश उर्फ विक्की भोसले यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही आरोपींनी त्याच्यामागे आणखी रक्कम पाहिजे म्हणून तगादा लावला होता. रक्कम परत करण्यास उशिर होत असल्यामुळे केदारे आणि भोसले आपल्या टोळीतील ४ ते ५ गुंडांसह ५ मे च्या दुपारी ३.३० वाजता श्रीकांतच्या घरात शिरले. त्यांनी श्रीकांतला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसविले आणि त्याचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी नेले. तेथे श्रीकांतला आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड तसेच बिअरच्या बाटलीने तब्बल दोन तास मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतला आरोपींनी सायंकाळी ५.२५ ला घराजवळ सोडून पळ काढला. गंभीर दुखापतीमुळेच ८ मे च्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.