अनैतिक संबंधातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:41+5:302021-02-27T04:08:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : सालईमेंढा (ता. कुही) शिवारात गुरुवारी (दि. २५) तरुणाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्या तरुणाचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : सालईमेंढा (ता. कुही) शिवारात गुरुवारी (दि. २५) तरुणाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्या तरुणाचा मृत्यू गिट्टीच्या खाणीच्या खड्ड्यात पडून झाल्याचा बनाव करण्यात आला हाेता. मात्र, त्याचा मृत्यू खड्ड्यात पडून झाला नसून, त्याचा खून करण्यात आल्याचा अंदाज लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत आराेपीला अटक केली. त्याचा खून अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचेही पाेलीस चाैकशीत उघड झाले.
चंदू गंगाधर महापुरे (२७, रा. पाचगाव, ता. कुही) असे मृताचे तर भारत वसंता गुजर (२५, रा. सालईमेंढा, ता. कुही) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. चंदूचा मृतदेह सालईमेंढा शिवारातील गिट्टीच्या खाणीच्या २५ फूट खाेल खड्ड्यात गुरुवारी आढळून आला हाेता. त्याचा मृत्यू खड्ड्यात पडून झाल्याचाही बनाव करण्यात आला हाेता. मात्र, या खड्ड्यापासून ७० मीटरवर पाेलिसांना रक्ताचा सडा आढळून आल्याने चंदूचा खून करण्यात आल्याची पाेलिसांना खात्री पटली हाेती. त्यामुळे कुही पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.
पाेलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भारतला संशयित म्हणून ताब्यात घेत विचारपूस सुरू केली. सुरुवातीला त्याने असंबद्ध उत्तरे दिली. नंतर मात्र सत्य सांगत चंदूचा खून केल्याचे मान्य केले. त्यामुळे कुही पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे, जावेद शेख, कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने, सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या पथकाने केली.
...
दीड लाख रुपये व शरीरसुखाचे प्रलाेभन
चंदू विवाहित असून, त्याचे एका तरुणीशी अनैतिक संबंध हाेते. त्या दाेघांमध्ये वाद निर्माण झाला हाेता. आईवडिलांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. यात चंदू आडकाठी निर्माण करीत असल्याची माहिती तरुणीने भारतला दिली हाेती. चंदू व भारत चांगले मित्र व नातेवाईक हाेते. काही दिवसांपूर्वी उधारीच्या रकमेवरून त्या दाेघांमध्ये भांडण झाले हाेते. त्यात चंदूने भारतवर चाकू उगारला हाेता. त्यामुळे तरुणीच्या आईवडिलांनी या कटात भारतला सामील करून घेतले. चंदूचा खून करण्यासाठी तिने भारतला १ लाख ५० हजार रुपये व शरीरसुखाचे प्रलाेभन दाखवले हाेते.
....
धारदार शस्त्राने गळा चिरला
दाेघेही गुरुवारी दुपारी माेटारसायकलने पाचगावला आले. तिथे मनसाेक्त मद्य प्यायले. त्यानंतर भारत चंदूला घेऊन काब्रा खाण परिसरात आला. तिथे त्या दाेघांमध्ये भांडण झाले. भारतने सुरुवातीला चंदूवर दगडाने वार केले. धारदार शस्त्राने चंदूचा गळा चिरला. त्याचा मृत्यू हाेताच त्याला २०० मीटर फरफटत खाणीच्या खड्ड्याजवळ नेले. तिथे त्याला फेकून देत भारत घरी परतला आणि काहीही घडले नाही, या अविर्भावात शेतातील कामे करू लागला.