एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या : मान व पाठीवर केले चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 09:27 PM2019-04-06T21:27:06+5:302019-04-06T21:28:07+5:30
तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असतानाच तिचा आधीचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यासमोर तरुणासोबत भांडायला सुरुवात केली. भांडण येथेच थांबले नाही तर, त्याने तरुणाच्या मान व पाठीवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनीमधील सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असतानाच तिचा आधीचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यासमोर तरुणासोबत भांडायला सुरुवात केली. भांडण येथेच थांबले नाही तर, त्याने तरुणाच्या मान व पाठीवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनीमधील सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
तुषार विजय झोडे (१९, रा. सोनखांब, ता. काटोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील विजय झोडे हे कोहळी (ता. कळमेश्वर) शिवारातील भागीरथ टेक्सटाईल्स मिलमध्ये नोरीकला असल्याने ते कुटुंबीयांसह पठाण लेआऊट, ब्राह्मणी येथील सुरेश माडेकर यांच्या घरी किरायाने राहतात. विधीसंघर्षग्रस्त बालक हा १६ वर्षांचा असून, आनंदनगर, आंबागेट, अमरावती येथील रहिवासी असून, तो मागील काही वर्षांपासून आईसोबत नवजीवन कॉलनी ब्राह्मणी येथील कृष्णा रोडे यांचे घरी किरायाने राहतो. त्याचे वडील मात्र अमरावतीलाच राहतात.
विधीसंघर्षग्रस्त बालकाचे येरला येथील मुलीसोबत मैत्री व प्रेमसंबंध होते. मध्यंतरी त्यांचा ‘ब्रेकअप’ झाला आणि तिची तुषारसोबत ओळख होऊन मैत्री झाली. तुषारने तिला नवजीवन कॉलनीतील सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ फोन करून भेटायला बोलावले होते. ते दोघेही दुपारी १ वाजताच्या सुमारास मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडाखाली बोलत असल्याची माहिती विधीसंघर्षग्रस्त बालकाला मिळाली. तो मंदिर परिसरात पोहोचताच त्याला दोघेही आपसात बोलत असल्याचे दिसले.
चिडलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने तिच्यासमोर तुषारसोबत भांडायला सुरुवात केली. काही वेळातच त्याने चाकू काढून तुषारच्या मान आणि पाठीवर वार केले. तो खाली कोसळताच त्याने तिथून पळ काढला. दुसरीकडे तिने लगेच पोलीस व रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले आणि त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उपभिागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.
तुषार आयटीआयचा विद्यार्थी
तुषार हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून, त्याला लहान बहीण आहे. तो गोधनी येथील आयटीआयमध्ये शिकायचा. विधीसंघर्षग्रस्त बालकही एकुलता एक असून, त्याने इयत्ता नववीपासून शिक्षण सोडले. मध्यंतरी तो वडिलांकडे अमरावतीला होता. तो १५ दिवसांपूर्वीच आईकडे ब्राह्मणीला आला होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, अमरावती शहरातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. तुषारवर हल्ला केल्यानंतर तो मित्राच्या मोटरसायकलने पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खापरखेडा (ता. सावनेर) परिसरातून ताब्यात घेतले.