जुन्या वादातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:24+5:302021-07-23T04:07:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : जुन्या वादातून शेजाऱ्याने तरुणाशी भांडण उकरून काढले. भांडण शमताच तरुण बेसावध असतानाच शेजाऱ्याने त्याच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : जुन्या वादातून शेजाऱ्याने तरुणाशी भांडण उकरून काढले. भांडण शमताच तरुण बेसावध असतानाच शेजाऱ्याने त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने १२ वार केले. त्यात त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा (देशमुख) येथे बुधवारी (दि. २२) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. यातील आराेपीस अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
किशोर मनोहर घाडगे (२६) असे मृताचे तर रामराव कावडकर (४५) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. दाेघेही अंबाडा (देशमुख), ता. नरखेड येथील रहिवासी असून, शेजारी आहेत. त्यांच्या काही दिवसांपासून वाद हाेता. त्यातच किशाेरने रामरावला बुधवारी रात्री शिवीगाळ केली आणि खर्रा घेण्यासाठी पानटपरीवर गेला.
ताे खर्रा घेऊन घरी परत आला आणि घराचे दार उघडत असताना रामरावने त्याच्या पाठ, मान व पाेटावर धारदार शस्त्राने १२ वार केले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व त्याला नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साेबतच आराेपी रामरावला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी जया मनाेहर घाडगे हिच्या तक्रारीवरून भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक खुटेमाटे करीत आहेत.
....
आठवडाभरातील दुसरी घटना
नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवडाभरातील खुनाची ही दुसरी घटना हाेय. यापूर्वी बेलाेना नजीकच्या गाेंडेगाव (ता. नरखेड) येथे दारूच्याच वादातून राेशन शेषराव बनाईत (३१, रा. बेलाेना, ता. नरखेड) याचा खून करण्यात आला तर त्या हाणामारीत माधव अलाेणे हा गंभीर तर हिमेश बनाफर हा किरकाेळ जखमी झाला. या प्रकरणात पाेलिसांनी तिघांना अटक केली. या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत दारूची अवैध विक्री वाढली असून, त्यातून भांडणे हाेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे.