आईला मारल्याने धाकट्या भावाने केली थाेरल्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:48+5:302021-07-15T04:06:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : आईला मारहाण केल्यावरून रागाच्या भरात धाकट्या भावाने थाेरल्या भावावर धारदार शस्त्राने वार करून त्याची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : आईला मारहाण केल्यावरून रागाच्या भरात धाकट्या भावाने थाेरल्या भावावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदी येथे बुधवारी (दि. १४) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेच्या चार तासातच पाेलिसांनी आराेपीला अटक केली.
कृष्णा बाबुराव मसराम (३८, रा. चारगाव (माैदी, ता. रामटेक) असे मृताचे नाव असून, प्रमाेद बाबुलाल मसराम (३६) असे आराेपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आराेपी प्रमाेदसह आणखी दाेन नातेवाईक आराेपी असून, त्यात अतुल कृष्णा तुराम व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा (रा. खसाळा, नागपूर) समावेश असण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी वर्तविली आहे. मृत कृष्णा मसराम हा मूळचा चारगाव येथील रहिवासी असून तो माैदी येथे त्याच्या घरकुलात राहात हाेता. त्याच्यासाेबत आराेपी प्रमाेदसुद्धा राहायचा. मात्र दाेघांमध्ये नेहमी वादविवाद हाेत असल्याने ता. खसाळा येथे राहू लागला.
मंगळवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास कृष्णा त्याचे आईवडील राहत असलेल्या चारगाव येथे गेला व त्याने आई दसवंती यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा पाय फॅक्चर झाल्याचे समजते. ही बाब कळताच प्रमाेद हा लगेच चारगावला पाेहाेचला. नातेवाईकांच्या मदतीने दसवंतीला प्रथम खासगी दवाखान्यात व नंतर देवलापार ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने तिला डाॅक्टरांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास नागपूर येथील मेडिकलमध्ये हलविले. अशात आराेपी प्रमाेदने माैदीवरून आधारकार्ड घेऊन येताे, असे सांगून आईसाेबत रुग्णवाहिकेत न जाता थेट माैदी येथे गेला. त्यावेळी कृष्णा घरी हाेता. प्रमाेदने घरात शिरून रागाच्या भरात धारदार शस्त्राने कृष्णावर वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा प्रकार कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच आराेपी प्रमाेद आईजवळ निघून गेला.
दरम्यान, मृत कृष्णा रक्ताच्या थाराेळ्यात पडून असल्याचे काहींच्या लक्षात येताच माैदी येथील पाेलीस पाटलांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. दरम्यान, आराेपी प्रमाेद हा नागपूर मेडिकलमध्ये असल्याची माहिती मिळताच ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी पाेलीस उपनिरीक्षक केशव कुंजरवाड यांच्या नेतृत्वात पाेलीस पथक नागपूरला रवाना केले. तिथे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आराेपीस अटक केली. या गुन्ह्यात आराेपीने आणखी दाेन साथीदाराची नावे पुढे केली असून, देवलापार पाेलीस त्याचा तपास करीत आहेत.