उमरेड शहरातील चाैकात तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:43+5:302021-06-21T04:07:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : दाेघेही काेळसा वाहतूक करणारे ट्रकचालक. आपसात चांगली ओळख. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला आणि ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : दाेघेही काेळसा वाहतूक करणारे ट्रकचालक. आपसात चांगली ओळख. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला आणि त्या वादाचे पर्यावसान भांडणात झाले. त्यातच एकाने दुसऱ्याच्या डाेक्यावर फरशीच्या तुकड्याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात दाेघांना अटक करण्यात आली आहे. खुनाची ही घटना उमरेड शहरातील गांगापूर भागातील चाैकात रविवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
शुभम मोतीराम ठवकर (२२, रा. गांगापूर, उमरेड) असे मृत तरुणाचे तर, शोएब ऊर्फ जॉनी शाहीद शेख (१९) व विक्रांत ऊर्फ विक्की महेंद्रसिंग चंदेल (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे नावे आहे. शुभम व जाॅनी ट्रकचालक असून, ते ट्रकद्वारे वेकाेलितील काेळशाची नियमित वाहतूक करायचे. त्यामुळे त्यांची आपसात ओळख हाेती. या दाेघांमध्ये शनिवारी (दि. १९) किरकाेळ कारणावरून भांडण झाले हाेते, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली असून, याला पाेलिसांनी दुजाेरा दिला आहे.
जाॅनीने शनिवारी रात्री शुभमच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. त्यानंतर जाॅनीने रविवारी सायंकाळी गांगापूर येथील चाैकात बघितले आणि त्याच्याशी भांडायला सुरुवात केली. याच भांडणात त्याने शुभमच्या डाेक्यावर फरशीच्या तुकड्याने वार केले. गंभीर दुखापत झाल्याने शुभम खाली काेसळला आणि काही वेळातच त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यावेळी जाॅनीकडे चाकू हाेता. त्याने शुभमवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला हाेता, अशी माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दुसरीकडे, पाेलिसांनी रात्री आराेपी जाॅनी व विक्रांतला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
....
जीवे मारण्याची धमकी
जाॅनी शनिवारी रात्री शुभमच्या घरी गेला हाेता. त्यावेळी जाॅनीने शुभमला अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. त्यामुळे शुभमने शनिवारी रात्री पाेलीस ठाणे गाठून जाॅनीच्या विराेधात तक्रार नाेंदविली हाेती. त्याअनुषंगाने उमरेड पाेलिसांनी जाॅनीच्या विराेधात अदखलपात्र (एनसी) गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले हाेते. शुभमच्या खुनाचे मूळ कारण कळू शकले नाही.
...
गुन्हेगारीत वाढ
या खून प्रकरणात जाॅनीसाेबत अन्य आराेपींचा सहभाग असल्याची शक्यताही व्यक्त केली जात हाेती. आराेपी पसार असल्याने पाेलिसांनी त्याचा शाेध घेणे सुरू केले. या प्रकरणात उमरेड पाेलिसांनी अटक केली. मागील काही वर्षापासून उमरेड शहर व परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या मनात असंताेषही निर्माण हाेत आहे.