सोनेगावात तरुणाची हत्या

By admin | Published: July 30, 2016 02:20 AM2016-07-30T02:20:13+5:302016-07-30T02:20:13+5:30

आपली चुगली करीत असल्याच्या संशयावरून वाद घालून गुरुवारी रात्री एका गुन्हेगाराने एका तरुणाची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली.

The murder of the youth in Solda | सोनेगावात तरुणाची हत्या

सोनेगावात तरुणाची हत्या

Next

नागपूर : आपली चुगली करीत असल्याच्या संशयावरून वाद घालून गुरुवारी रात्री एका गुन्हेगाराने एका तरुणाची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली. विक्रम शामराव पाटील (वय ४२) असे मृताचे नाव आहे. तो पेंटिंग काम करायचा. आरोपीचे नाव रणधीरसिंग श्यामबहादूरसिंग (वय ३६) असून तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगरात या दोघांचेही घर आहे.

आरोपी रणधीर गुन्हेगारी वृत्तीचा असून, चोरी, लुटमारीच्या गुन्ह्यात नाव आल्याने परिसरात तो बदनाम आहे. त्याचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सीआरपीएफची सध्या भरती सुरू आहे. त्यामुळे येथे बाहेरगावच्या तरुणांची, यांच्या नातेवाईकांची वर्दळ आहे. एका रात्रीचा मुक्काम अन् तयार होण्यासाठी या भागातील काही जण ५० ते १०० रुपये घेतात. विक्रम आणि रणधीर हे दोघेही असेच करायचे. रणधीरकडे थांबलेल्या अनेकांचे किमती साहित्य चोरीला गेल्याची चर्चा आहे. दणकट शरीरयष्टीचा रणधीर धाक दाखवून गप्प करीत असल्याने त्याच्याविरोधात कुणी तक्रार द्यायला धजावत नाही. मात्र, त्याच्यापासून बहुतांश जण सावध राहण्याची बाहेरच्या तरुणांना सूचना करतात.
गुरुवारी सायंकाळी असेच झाले. विक्रमजवळ आलेल्या काही तरुणांनी तात्पुरत्या मुक्कामासंदर्भात चौकशी केली. विक्रमने आपल्याकडे जागा नाही. मात्र, जेथे कुठे राहाल, चौकसपणे मुक्काम करा कारण किमती चीजवस्तू चोरीला जात असल्याचे त्यांना सांगितले. बाजूला असलेल्या रणधीरने हे ऐकले. त्यानंतर तो थेट विक्रमच्या अंगावर चालून आला. विक्रमची कोणतीही बाब ऐकून न घेता त्याला ठोसे लगावून खाली पाडले. त्यानंतर लाथा मारल्या. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही. तर, कपडे आपटावे, तसे उचलून तो विक्रमला जमिनीवर पटकू लागला. (प्रतिनिधी)

कुणीच धावले नाही मदतीला
अर्धमेल्या अवस्थेत सोडून आरोपी पळून गेला. ज्या तरुणांना विक्रमने सतर्क केले. त्यांच्यासह अनेक नागरिक ही अमानुष मारहाण बघत होते. मात्र, कुणीही विक्रमच्या मदतीला धावण्याचे धाडस दाखविले नाही. फोनवरून माहिती मिळाल्यानंतर सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी विक्रमला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आरोपी तासाभरातच गजाआड
घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी रणधीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि धावपळ करीत तासाभरातच आरोपीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त सुहास वारके, उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त शेखर तोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक बागुल, द्वितीय निरीक्षक काळे, सहायक निरीक्षक पाटील, नितीन पगारे, उपनिरीक्षक मेश्राम, नप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: The murder of the youth in Solda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.