नागपुरात अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 08:55 PM2019-02-28T20:55:46+5:302019-02-28T21:05:19+5:30
बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक संजय धनराज चव्हाण याच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात हुडकेश्वर पोलिसांनी यश मिळवले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने संजयच्या पत्नीनेच सुपारी किलरच्या माध्यमातून तीन लाखांची सुपारी देऊन संजयचा गेम केल्याचे उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक संजय धनराज चव्हाण याच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात हुडकेश्वर पोलिसांनी यश मिळवले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने संजयच्या पत्नीनेच सुपारी किलरच्या माध्यमातून तीन लाखांची सुपारी देऊन संजयचा गेम केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी संजयची पत्नी स्नेहा, तिचा प्रियकर योगेश पुरुषोत्तम गहाणे (दिघोरी), प्रकाश चंद्रशेखर जवादे (रा. चंद्रनगर, पारडी) आणि आकाश ऊर्फ बिट्टू ओमप्रकाश सोमकुंवर या चौघांना अटक केली. मात्र, तीनही सुपारी किलर फरार आहेत. विशेष म्हणजे अटकेतील आरोपी प्रकाश हा पोलीस कर्मचारी आहे.
संजय धनराज चव्हाण (वय ३६, रा. गणेश अपार्टमेंट, दिघोरी) यांची गणेशपेठमध्ये प्रिंटिंग प्रेस आहे. ते पत्नी स्नेहा (वय २५) आणि पाच वर्षाच्या मुलासह राहत होते. बाजूलाच राहणारा योगेश गोहणे याच्यासोबत मैत्री असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. बाहेरख्याली वृत्तीच्या स्नेहाचे दोन वर्षांपूर्वी अनैतिक संबंध जुळले. संजय घरी नसताना ती योगेशला घरी बोलवायची आणि ते दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. त्यांच्या संबंधात आता संजय अडसर ठरू लागल्याने स्नेहा आणि योगेशने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. ग्रामीण मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी प्रकाश जवादे योगेश गहाणेचा मित्र होय. प्रकाशला योगेशने संजयचा काटा काढायचा आहे, असे सांगून त्यासाठी दोन-तीन पेटी खर्च करण्याची तयारीही दाखवली. पोलीस दलात राहूनही गुन्हेगारी वृत्तीच्या प्रकाशने लगेच कटात सहभागी होऊन सुपारी किलरची भेट घालून दिली. त्यानुसार तीन लाख रुपयात संजयचा गेम करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी रात्री योगेशने संजयला पार्टीच्या बहाण्याने विहीरगावजवळच्या हायलॅण्ड ढाब्यावर नेले, सोबत प्रकाशही होता. तेथे योगेश आणि प्रकाशने संजयला भरपूर दारू पाजली. तेवढ्यात तेथे सुपारी किलर सोमकुंवर आणि त्याचे साथीदार पोहचले. त्यांनी ढाब्यावर जेवण घेतले. त्यानंतर योगेश आणि संजय एका दुचाकीवर तर प्रकाश हा मोटरसायकलने ढाब्यावरून निघाला.
ओरिएन्टल कंपनीजवळ लघुशंकेच्या बहाण्याने योगेशने दुचाकी थांबवली. ठरल्याप्रमाणे मागून सोमकुंवर आणि त्याचे साथीदार कारने आले. आरोपींनी संजयवर शस्त्राचे घाव घातल्यानंतर जड वस्तूने डोके ठेचले. त्यानंतर मृतदेह नाल्याजवळ फेकून आरोपी पसार झाले.
अपघाताचा देखावा
आरोपींनी हे हत्याकांड न वाटता अपघात वाटावा, असे घटनास्थळी चित्र निर्माण केले. मृत संजयची दुचाकी बाजूला पडून होती. बुधवारी सकाळी हे थरारकांड उघडकीस आल्यानंतर संजयचा भाऊ अजय धनराज चव्हाण याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळ परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर विचारपूस करतानाच सीसीटीव्ही तपासले असता त्यात संजयसोबत आरोपी योगेश दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो गडबडला आणि त्याने हत्येची कबुली दिली. त्याने कटकारस्थान सांगतानाच अन्य आरोपींची नावेही सांगितली. त्यानंतर पोलिसांनी स्नेहा, प्रकाश आणि आकाश सोमकुंवरला अटक केली. पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, सहायक आयुक्त एस. एल. शिंदे तसेच ठाणेदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय नाईक, सत्यवान कदम, उपनिरीक्षक शुभांगी मोहारे, हवालदार मनोज नेवारे, परेश दिवटेलवार, नीलेश ढोणे, ललित तितरमारे, राजेश डेकाटे, संतोष चौधरी, चंद्रशेखर कौरती, विलास चिंचुळकर, प्रफुल्ल वाघमारे आणि मयूर सातपुते यांनी अवघ्या २४ तासात या हत्याकांडाचा छडा लावण्याची कामगिरी बजावली. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हत्याही त्याचीच अन् सुपारीचे पैसेही त्याचेच
या प्रकरणात संजयच्या पत्नीचा पुन्हा एक निर्दयी पैलू समोर आला. तो म्हणजे, तिने संजयची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांना ३० हजार रुपये अॅडव्हान्स दिले. ती रक्कम तिने संजयच्याच खिशातून काही तासांपूर्वी काढून घेतली होती. स्नेहाने तिच्या अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या संजयला काही दिवसांपूर्वी घटस्फोट मागितला होता. संजयने पाच वर्षांचा मुलगा आहे, तुझे सर्व चोचले पुरवितो, त्यामुळे तुला कशाला घटस्फोट पाहिजे, अशी विचारणा केली होती. एवढेच नव्हे तर तिला घटस्फोट देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तू कुठे पळून गेली तरी तुला घटस्फोट मिळणार नाही, असेही बजावले होते. त्यामुळे ती संतापली होती. तिने योगेशलाही तातडीने संजयचा काटा काढ नाही तर भलतेच वळण मिळेल, असा धमकीवजा इशारा दिला होता.