न्यायालय आवारात खुनी हल्ला
By admin | Published: February 27, 2015 02:00 AM2015-02-27T02:00:00+5:302015-02-27T02:00:00+5:30
कॉटनमार्केट हल्ल्याच्या खटल्यातील साक्षीदारांनी आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यावर धारदार वस्तऱ्याने खुनी हल्ला करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना ...
नागपूर : कॉटनमार्केट हल्ल्याच्या खटल्यातील साक्षीदारांनी आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यावर धारदार वस्तऱ्याने खुनी हल्ला करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी १.४० वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ‘ओल्ड ट्रेझरी बार रूम’समोर घडली. या घटनेने बऱ्याच अवकाशानंतर न्यायालय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अक्षय किशोर तिवारी (२१) रा. गणेशपेठ पोलीस क्वॉर्टरमागे आणि हनी गोविंदप्रसाद तिवारी (२०) रा. कॉटनमार्केट चौक हनुमानमंदिरजवळ, अशी जखमींची नावे आहेत. मोहम्मद साबीर अली मोहम्मद रा. कामगारनगर टेका नाका, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे इतर साथीदार पसार झाले.
काय होता कॉटन मार्केट हल्ला ?
मोहम्मद साबीर अली हा कॉटनमार्केट चौकात फुटपाथवर शकील जनरल स्टोअर्स या नावाने ‘जेन्टस् अॅक्सेसरी’ चे दुकान लावत होता. त्यामुळे कॉटन मार्केट चौकात राहणारे तिवारी बंधू या दुकानास विरोध करीत होते. त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. ५ एप्रिल २०१४ रोजी नेहमीप्रमाणे भांडण होऊन तिवारी बंधू आणि साथीदाराने मोहम्मद साबीर याचा भाऊ मोहम्मद फय्याज याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. गणेशपेठ पोलिसांनी भादंविच्या ३२६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा फिर्यादी मोहम्मद साबीर हा आहे. तर हिमांशू ऊर्फ छोटू गोविंदप्रसाद तिवारी, हनी गोविंदप्रसाद तिवारी आणि शेख राजा शेख कासम रा. मोमीनपुरा हे आरोपी आहेत.
खटला सुनावणीस होणार होती सुरुवात
कॉटनमार्केट खुनी हल्ला खटला सुनावणीस आजपासून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात सुरुवात होणार होती. साक्ष देण्यासाठी मोहम्मद साबीर, सादिक शहा, मोहम्मद फय्याज आणि शाबीर पठाण यांना समन्स प्राप्त झाला होता. हनी तिवारी आणि अन्य आरोपींनी न्यायालयात हजेरी लावली होती. परंतु सुनावणी अवकाश असल्याने हनी आणि साथीदार ओल्ड ट्रेझरी इमारतीतील माधवी एन्टरप्रायजेसमोर झाडा सावलीच्या आडोशाला गेले तेथे हल्लेखोर मोटरसायकलींवर बसून होते. त्यांच्यात बाचाबाची होऊन मोहम्मद साबीर आणि साथीदारांनी वस्तरा काढून अचानक हल्ला केला. अक्षय तिवारी याच्या डाव्या हाताच्या पंजावर, कोथ्यावर आणि हनी तिवारी याच्या गळ्यावर वस्तऱ्याच्या जखमा आहेत.
रक्तबंबाळ अवस्थेत घेतली न्यायालयात धाव
हल्ल्याच्या घटनेनंतर हनी रक्तबंबाळ अवस्थेत गळ्याला हात लावून न्यायालय कक्षात शिरला. त्याने न्यायासनासमोर उभे होऊन आपणावर हल्ला होऊन गळा कापल्याचे सांगताच न्यायालयाने त्याला ताबडतोब पोलीस सुरक्षा चौकीत जाण्यास सांगितले. हा जखमी आपल्या न्यायालयीन पेशीचे आता काय होणार, हे विचारण्यासाठी न्यायालयात गेला होता.
अचानक उडाली तारांबळ
खुनी हल्ला करणाऱ्यांचा जखमी आणि त्यांचे साथीदार आरडाओरड करीत पाठलाग करीत असताना न्यायालय आवारातील गर्दीची तारांबळ उडाली होती. आरोपी करोडपती गल्लीपर्यंत धावत जाऊन बेपत्ता झाले होते. लागलीच दोन्ही जखमी न्यायालय सुरक्षा पोलीस चौकीत आले. चौकीचे प्रमुख विजयकुमार वाकसे यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष आणि सदर पोलीस ठाण्याला घटनेची सूचना देताच अतिरिक्त पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. जखमींना त्वरित मेयो इस्पितळाकडे उपचारार्थ रवाना करण्यात आले. सदर पोलिसांनी हल्लेखोर मोहम्मद साबीर याला अटक केली.