संग्रहाच्या आवडीने घरालाच बनविले ‘म्युझियम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:03 AM2018-05-18T01:03:06+5:302018-05-18T01:03:19+5:30
एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु शहरात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या विविध वस्तूंचा संग्रह करण्याच्या छंदातून घरातच एक छोटे संग्रहालय (म्युझियम) तयार केले आहे. ‘जागतिक संग्रहालय’ दिनाच्या पर्वावर ‘लोकमत’ने शहरातील काही संग्रहकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु शहरात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या विविध वस्तूंचा संग्रह करण्याच्या छंदातून घरातच एक छोटे संग्रहालय (म्युझियम) तयार केले आहे. ‘जागतिक संग्रहालय’ दिनाच्या पर्वावर ‘लोकमत’ने शहरातील काही संग्रहकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला.
-अर्णवने ‘इरेजर’चा केला संग्रह
टिळकनगर येथील रहिवासी पाचव्या वर्गाचा अर्णव हेगे याने विविध आकार व डिझाईनमधील शेकडो खोडरबरचा (इरेजर) संग्रह केला आहे. अर्णवने सांगितले की, जेव्हा तो पहिल्या वर्गात होता तेव्हापासूनच आईकडे हट्ट धरून वेगवेगळ्या आकार व प्रकारातील इरेजर खरेदी करायचा. विशेष म्हणजे, लहान मुलांमध्ये इरेजरला घेऊन आकर्षण असते, परंतु अर्णवने या आकर्षणालाच छंदाचे स्वरूप दिले. आज त्याच्याकडे इरेजरचा मोठा संग्रह आहे. यात सँडल, फ्रॉक, ब्रश, टोपी, बंदूक, अंडी, कार, चष्मा, व्हॅन, विमान, फूल आणि विविध फळांच्या आकारातील इरेजर आहेत. अर्णवने सांगितले, आजही नव्या आकारातील इरेजर दिसल्यास त्याच्या खरेदीचा प्रयत्न असतो.
- विविध वस्तूंच्या संग्रहामुळे मिळाले अनेक पुरस्कार
गेल्या ३५ वर्षांपासून दीपक संत विविध वस्तूंचे संग्रह करीत आहेत. त्यांच्या या छंदाने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संत यांच्याकडे विदेशी हॉटेलमधील ७५ प्रकारचे चावीचे कार्ड संग्रहित आहेत. हे चावीचे कार्ड त्यांना मलेशिया, जपान, नेपाळ, भूतान, सिंगापूर, चीन, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आदी देशात जाऊन व विदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडून मिळाले आहेत. हे कार्ड एटीएमसारखेच असते. जेवढ्या दिवसांसाठी हॉटेल बुक केले आहे, तेवढे दिवस हे कार्ड चालते. याशिवाय संत यांच्याकडे विदेशी साबण, राशीवर आधारित गणपतीच्या चित्रांचा मोठा संग्रह त्यांनी केला आहे. या संग्रहामुळेच त्यांना ११ वेळा ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ मिळाले आहेत, सोबतच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
झिंगाबाई टाकळी, श्रीकृष्णनगर येथील रहिवासी जयंत तांदूळकरची आवड खरंच आश्चर्य व्यक्त करणारी आहे. त्यांच्याकडे बासापासून तयार केलेले घोडे, बैलगाडी यांच्यासह काचेच्या बॉटल्सच्या आत ‘लेटर बॉक्स’, आगपेटी, फ्लॉवर पॉट, पेन स्टॅण्ड आदी वस्तू त्याने मोठ्या कुशलतेने टाकल्या आहेत. तांदूळकरने सांगितले, लहानपणापासून याची आवड होती. त्यांनी काचेचे ताजमहालही साकारले आहे, आता ते बॉटल्सच्या आत टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी तयार केलेली बासाची खाट, सोफा, लॅम्प, टांगा, पितळेची छोटी बोअरवेल, छोटा टिफीन बॉक्स आदी वस्तू पाहण्यासारख्या आहेत. आश्चर्य म्हणजे तांदूळकर यांनी पाऊण इंचाची भगवद्गीता तयार केली आहे.
जुनी भांडी संग्रहित करण्याची आवड
मेयोमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विभा मोडक यांना जुन्या काळातील भांड्यांचा संग्रह करण्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत मोठ्या संख्येत याचा संग्रह केला आहे. त्यांच्यानुसार नव्या पिढीला या जुन्या वस्तूंची माहिती व्हावी, त्यांना ते पाहता यावे या उद्देशाने त्यांनी हा संग्रह केला आहे. गेल्या १८ वर्षांपासून त्यांचा हा छंद सुरू असून, यात माती व सिरॅमिकच्या शेकडो भांड्यांचा संग्रह आहे. ते स्वत:ही मातीच्या भांड्यामध्ये जेवण तयार करतात. त्यांनी आपले घर या संग्रहाच्या माध्यमातून उत्तम सजविले आहे.