राज्यातील प्राणि संग्रहालये अद्ययावत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 08:53 PM2018-03-26T20:53:46+5:302018-03-26T20:53:59+5:30
प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे मुख्य वनसंरक्षक एस. एस. डोळे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे मुख्य वनसंरक्षक एस. एस. डोळे यांनी व्यक्त केले.
सेमिनरी हिल्स येथील वन सभागृह येथे महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटर संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस विभागीय वन अधिकारी कमलाकर धामगे, जिजाबाई प्राणिसंग्रहालय मुंबईचे डॉ. संजय त्रिपाठी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईचे शैलेश देवरे, राजीव गांधी वन्यप्राणी संशोधन केंद्र, कात्रज, पुणेचे डॉ. राजकुमार जाधव, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय चिंचवड, पुणेचे दीपक सावंत, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय सोलापूरच्या डॉ. शुभांगी ताजने, आमटे प्राणी उद्यान केंद्र हेमलकसा गडचिरोलीचे अनिकेत आमटे, सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय औरंगाबादचे डॉ. बी. एस. नाईकवाडे, महाराज बाग प्राणिसंग्रहालय, नागपूरचे डॉ. सुनील बावस्कर व सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, पंजाबराव कृषी विद्यापीठ सर्प उद्यान ढोलगरवाडी कोल्हापूरचे तानाजी वाघमारे, पीपल फॉर अॅनिमल, वर्ध्याचे आशिष गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत पुढील १० वर्षांसाठी प्राणिसंग्रहालयाचा मास्टर प्लान, नवीन सुधारणा आराखडा, प्राणिसंग्रहालयात अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि कल्पकतेचा वापर, परवाना नूतनीकरण व रिक्त पदांची माहिती,लोकप्रबोधन, जनजागृतीची कामे, पर्यटकांसाठी केलेल्या उपाययोजना, प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त व आवश्यक प्राण्यांच्या बाबतीत आढावा व अदलाबदलीबाबत समन्वय तसेच विविध प्राणिसंग्रहालयास पर्यटकांनी दिलेल्या भेटी व मिळालेला महसूल अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या कामासंदर्भात विविध विभागाच्या संचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.