संग्रहालय म्हणजे विज्ञानाची तीर्थक्षेत्रे - डॉ. नितीन पाटील, माफसुचे संग्रहालय जनतेसाठी खुले
By जितेंद्र ढवळे | Published: December 7, 2023 04:52 PM2023-12-07T16:52:20+5:302023-12-07T16:52:41+5:30
माफसूच्या वतीने सेमिनरी हिल्स येथील विद्यापीठ ग्रंथालय परिसरात उभारण्यात आलेल्या विद्यापीठाचे संग्रहालय नागरिक आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संग्रहालय म्हणजे केवळ शेतकरी, पशुपालक, संशोधक यांच्यासाठी रंजक माहितीचे संसाधन नसून शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान युगातील आधुनिक तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले. विद्यापीठाच्या २३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. या वेळी माफसूच्या वतीने सेमिनरी हिल्स येथील विद्यापीठ ग्रंथालय परिसरात उभारण्यात आलेल्या विद्यापीठाचे संग्रहालय नागरिक आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले असल्याची माहिती त्यांनी दिली.
पशुवैद्यकीय विद्यापीठामार्फत ज्ञान प्रसारणासाठी स्थापन करण्यात आलेले हे संग्रहालय सांघिक प्रयत्नातून निर्माण झाल्याची माहिती या वेळी विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी प्रास्ताविकपर भाषणात दिली. याप्रसंगी पशुविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, कुलसचिव तथा संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. सचिन बोंडे, पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आरजू सोमकुवर, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर कविटकर, नियंत्रक (वित्त व लेखा) मनीषा शेंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. भूषण रामटेके आदी उपस्थित होते.