संग्रहालयांतून संबंधित देशाची प्रतिमा उजागर होते; जागतिक संग्रहालय दिनानिमित्त प्राध्यापकांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 08:00 AM2022-05-19T08:00:00+5:302022-05-19T08:00:01+5:30
Nagpur News पाषाण युगापासून ते वर्तमानापर्यंतच्या वाटचालीचे साक्षीदार म्हणजे संग्रहालये असल्याचे प्रतिपादन लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
नागपूर : जगभरात असलेली संग्रहालये, ही त्या देशाची प्रतिमा उजागर करतात. त्या देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. पाषाण युगापासून ते वर्तमानापर्यंतच्या वाटचालीचे साक्षीदार म्हणजे संग्रहालये असल्याचे प्रतिपादन लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
अजब बंगला अर्थात मध्यवर्ती संग्रहालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व जागतिक संग्रहालय दिन सप्ताहानिमित्त विदर्भातील चित्रकला महाविद्यालयांत कार्यरत प्राध्यापकांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी विजय दर्डा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बालचित्रकारांच्या बसोली ग्रुपचे संस्थापक व प्रख्यात चित्रकार चंद्रकांत चन्ने, मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक जया वाहणे, ज्येष्ठ चित्रकार व माजी आमदार दीनानाथ पडोळे, चित्रकार मिलिंद लिंबेकर उपस्थित होते.
जगभरातील संग्रहालयांतून संबंधित देशांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होत असतो. ही संग्रहालये त्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांची कथा प्रक्षेपित करत असतात. मात्र, जेव्हा या संग्रहालयांच्या संवर्धनाचा विचार केला जातो, तेव्हा ही बाब राजकीय पटलावर विरून जाते. त्यामुळे ही जबाबदारी एक नागरिक म्हणून आपल्यावर येऊन ठेपते आहे. लोकांनी संग्रहालयांना भेट देणे आणि देणग्या देऊन संग्रहालये टिकवून ठेवण्यास हातभार लावण्याचे आवाहन विजय दर्डा यांनी केले. संग्रहालयाची सुरुवात घरापासून होते आणि प्रत्येक घर हे संग्रहालय आहे. नागरिकांना संग्रहालयांपर्यंत आकर्षित करण्यासाठी अशा तऱ्हेच्या उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. त्यासाठी चित्रकारांना आपल्या कलाकृती आविष्कृत करण्यासाठी संग्रहालये, आर्ट गॅलरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे, ही काळाची गरज असल्याचे विजय दर्डा यावेळी म्हणाले. हे प्रदर्शन २२ मेपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाोच्या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती प्रास्ताविकातून मिलिंद लिंबेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन अपूर्वा घागरे यांनी केले, तर आभार डॉ. सदानंद चौधरी यांनी मानले.
चित्रकार हिटलर पुन्हा जन्माला यावा -चंद्रकांत चन्ने
हिटलर हा कसा होता, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, तो चित्रकार होता आणि कलाप्रेमी होता. जगभरातील संग्रहालयांच्या तो प्रेमात होता आणि युद्धात संग्रहालयांना सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्याने आपल्या सैनिकांना दिले होते. एका सैनिकाने त्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे, त्याने त्यास ठार मारले होते. असा चित्रकार, संग्रहालयप्रेमी हिटलर पुन्हा जन्माला यावा, अशी भावना बालकलावंतांच्या बसोली ग्रुपचे संस्थापक व चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी यावेळी केले. मध्यवर्ती संग्रहालयाच्या गोदामात याआधी प्रसिद्ध कलावंत वासुदेव गायतोंडे यांची सहाहून अधिक चित्रे अडगळीत पडल्याची दुर्दैवी बाब चन्ने यांनी यावेळी सांगितली. ही बाब संग्रहालये व त्यातील कर्मचाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विदर्भातील प्राध्यापकांचे चित्रप्रदर्शन
विदर्भातील प्राध्यापकांच्या या चित्रप्रदर्शनात ज्योती हेजीब, भाऊ दांदडे, मिलिंद अटकले, मृण्मयी बोबडे, गणपत भडके, दीपाली लिंबेकर, विकास जोशी, डॉ. रवींद्र हरदास, विनोद चव्हाण, प्रवीण बाळापुरे, पंकज इटकेलवार, सारंग नागठाणे, मृणाल जोहरापूरकर, अमुल कामडी, एबी गफ्फार एबी सत्तार, रवी प्रताप सिंग, संजय जठार, स्नेहल लिमये ओक, बाबर शरीफ, डॉ. किशोर इंगळे, डॉ. हरीश वाळके, गणेश बोबडे, चंद्रशेखर वाघमारे, प्रफुल्ल तायवाडे, डॉ. सदानंद चौधरी, हेमंत मोहड, वैशाली पखाले, प्रफुल्ल डेकाटे, रश्मी शेलवट, आशिष उजवणे, प्रफुल्ल नायसे, नाना मिसाळ आदींचे चित्र सादर करण्यात आले आहे.
..................