व्हायरल प्रसिद्धी ठीक; पण परिश्रमाशिवाय पर्याय नाही : निखिल पाॅल जाॅर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 11:06 AM2022-02-10T11:06:05+5:302022-02-10T11:11:11+5:30
साेशल मीडियावर ट्रेण्ड हाेणे क्षणिक प्रसिद्धीसाठी चांगले; पण या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत व समर्पणाशिवाय पर्याय नाही, अशी पाॅल जाॅर्जने व्यक्त केली.
नागपूर :संगीत नियाेजक म्हणून आता बाॅलिवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिरावत असलेल्या नागपूरच्या निखिल पाॅल जाॅर्जचा नवीन म्युझिक अल्बम ‘दिलाें की नजदीकियां’ प्रसिद्ध झाला. व्हॅलेंटाईन गीत, संगीतामुळे तरुणांना ताे आवडेल, अशी आशा निखिलने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या टीमने साेशल मीडियावर सक्रियता वाढविली आहे. साेशल मीडियावर ट्रेण्ड हाेणे क्षणिक प्रसिद्धीसाठी चांगले; पण या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत व समर्पणाशिवाय पर्याय नाही, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.
‘लाेकमत - महारक्तदान शिबिरा’चे थीम साॅंग कम्पाेज केलेल्या निखिलसह नागपूरची अभिनेत्री पलचिन व फाेटाेग्राफी डायरेक्टर स्वप्निल रे यांनी लाेकमत प्रतिनिधीशी संवाद साधला. ‘दिलाें की नजदीकियां’ हे गाणे तसे २०१४ मध्ये आलेल्या अभिनेता शाहीद कपूर व आलिया भटच्या चित्रपटातील आहे, जे स्वत: निखिलनेच गायले आहे. मात्र नव्या अल्बममध्ये हे गाणे निखिल व पलचिन यांच्यावर चित्रित केले आहे. आणखी एक विशेषत: म्हणजे अल्बमचे संगीत संयाेजन, फाेटाेग्राफी अशा सर्व तांत्रिक बाजू नागपूरच्याच कलावंतांनी सांभाळल्या आहेत. नागपूरमध्ये अमर्याद टॅलेन्ट आहे आणि त्यांना संधी मिळेल असे प्राेजेक्ट पुढेही तयार करण्याची इच्छा निखिलने व्यक्त केली.
निखिलने ‘बर्फी’, ‘शानदार’ अशा चित्रपटांमध्ये गाणे गायले आहे. मात्र संगीत संयाेजक म्हणून ‘ऐ दिल है मुश्किल, दंगल, ये जवानी है दिवानी’ अशा चित्रपटांत काम केले आहे. पुढेही अनेक चित्रपट येऊ घातले आहेत, ज्यात ताे संगीत कम्पाेजर आणि गायक म्हणूनही स्थिरावताे आहे. बाॅलिवूडमध्ये संगीत क्षेत्रात नागपूरचे अनेक कलावंत आहेत व नागपूरकर म्हणून याचा अभिमान असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
नागपूर टू बाॅलिवूड व्हाया लंडन
निखिल संगीत क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला हाेता. यामधूनच हळूहळू त्याची ओळख निर्माण हाेत हाेती. अशात प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांचा फाेन आला आणि आपल्यासाेबत काम करण्यास सांगितले. यामधूनच त्याचा बाॅलिवूडचा प्रवास सुरू झाला. ‘बर्फी’ चित्रपटात साईड गायक म्हणून गाणे गाण्याची संधी मिळाली; पण दिग्दर्शक अनुराग बसू यांना त्याचाच आवाज आवडला आणि पूर्ण गाणे त्याचे झाले. आता गायक म्हणूनही त्याची ओळख निर्माण हाेत आहे.