संगीत हे परिणामकारी औषध आहे; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्पंदन महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 09:24 PM2023-04-24T21:24:36+5:302023-04-24T21:25:11+5:30
Nagpur News संगीत हे मनुष्याच्या अंतर्मनाचा वेध घेणारे व अंतर्मनातील आजार बरे करणारे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे या संगीतीय उपक्रमाचा उपयोग भावी डॉक्टरांनी येणाऱ्या वैद्यकीय जीवनात करावा, असे प्रतिपादन डॉ. परिणिता फुके यांनी केले.
नागपूर : संगीत हे मनुष्याच्या अंतर्मनाचा वेध घेणारे व अंतर्मनातील आजार बरे करणारे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे या संगीतीय उपक्रमाचा उपयोग भावी डॉक्टरांनी येणाऱ्या वैद्यकीय जीवनात करावा, असे प्रतिपादन डॉ. परिणिता फुके यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील सभागृहात आयोजित स्पंदन महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्याशाखेचे अध्यक्ष दिलीप गोडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा नागपूर प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक समन्वयक डॉ. संजीव चौधरी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ, स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक नागपाल व स्पंदन संस्थेचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल गायकवाड उपस्थित होते.
स्पंदन महोत्सवात विविध संगीतमय स्पर्धा होणार आहेत. महोत्सवात आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. डॉ. संजीव चौधरी यांनी नागपूर येथे या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे आभार मानले. महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका संस्थेचे सचिव हेमंत काळमेघ यांनी विशद केली. स्पंदनसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे विचार, कला आणि व्यक्तिमत्त्वाचे आदान-प्रदान होत असल्याचे मत डॉ. दिलीप गोडे यांनी व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. संजीव चौधरी यांनी करून दिला. आभार स्वराली झोडे हिने मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
............