मेट्रोच्या प्रवाशांना संगीतमय मेजवानी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:10+5:302020-12-29T04:08:10+5:30
रविवारचा आनंद द्विगुणित : मेट्रो स्थानकावर शॉपिंगची सुविधा नागपूर : रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे असंख्य नागपूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मेट्रोने ...
रविवारचा आनंद द्विगुणित : मेट्रो स्थानकावर शॉपिंगची सुविधा
नागपूर : रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे असंख्य नागपूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मेट्रोने प्रवास करण्याचा बेत आखला. प्रवाशांच्या आनंदात भर घालण्यासाठी महा मेट्रोनेही प्रवाशांना संगीतमय मेजवानी दिली. सीताबर्डी येथील इंटरचेंज स्थानकावर प्रवाशांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.
महामेट्रोच्यावतीने सीताबर्डी येथील इंटरचेंज स्थानकावर गाण्याची, शॉपिंगची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्था केली होती. दुपारी १२ ते ३ दरम्यान केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या (सीआरपीएफ) वतीने बँड वादन करण्यात आले. यात सीआरपीएफचे उपनिरीक्षक अनिल जी, विल्सन टी. जे, एम. एस. काटेवार, दिनेश कुमार, एच. के. दुबे, ए. एम. शेख, नितीन घंघाव, अश्विन कांबळे, महान जायभोले, पी. एन. सांडेकर, अतुल तबाली, नीलेश काकडे, सुनील मंजाळ, ललिंदर कुमार यांनी बँड वादन केले. दुपारी ४ ते सायंकाळी ६ दरम्यान गायक सचिन आणि सुरभी ढोमणे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रवाशांना भुरळ घातली. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांना प्रवाशांनी दाद दिली. सीताबर्डी इंटरजेंच स्थानकावर शॉपिंगसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. यात आयुर्वेदिक तसेच पर्यावरणपूरक वस्तु विक्रीसाठी उपलब्ध होत्या. प्रवाशांना विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती. बहुतांश प्रवाशांनी ऑरेंज आणि अॅक्वा मार्गावर प्रवास करून आपले अनुभव कथन केले. नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या १५० सदस्यांनीही मेट्रोने प्रवास केला. महामेट्रोत सायकलसह प्रवास, सेलिब्रेशन ऑन व्हील्स, फिडर सर्व्हिस सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे प्रवाशांचा मेट्रोला प्रतिसाद वाढत आहे.
..............