म्युझिकल फाऊंटेन : फुटाळ्याचा चौपाटीचा रस्ता तुटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:31 PM2019-07-19T22:31:33+5:302019-07-19T22:32:37+5:30
फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळा चौपाटीचा मुख्य रस्ता नामशेष होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळा चौपाटीचा मुख्य रस्ता नामशेष होणार आहे.
‘माझी मेट्रो’ साकारणाऱ्या महामेट्रो प्रशासनाच्या गुणवत्तापूर्ण कामामुळे, विविध विभागांतर्गत येणारी कामेसुद्धा महामेट्रो प्रशासनाला दिली जात आहे. वेळेत काम पूर्ण करण्याची ख्यातिप्राप्त असलेल्या महामेट्रो प्रशासनाला फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणातील काही भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने, फुटाळा तलाव चौपाटीचा मुख्य रस्ता हटविण्याची आणि त्याला पर्यायी रस्ता बनविण्याची जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. मुख्य रस्ता हटविण्यापूर्वी दळणवळणाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून पर्यायी नवा रस्ता बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी फुटाळा तलाव चौपाटीवर असलेले हॉटेल्स आधीच हटविण्यात आले आहेत. सध्या असलेल्या मुख्य रस्त्यावर हा नवा पर्यायी मजबूत रस्ता तयार झाल्यावर, म्युझिकल फाऊंटेनचा रसास्वाद घेण्यास इच्छुक प्रेक्षकांसाठी भव्यदिव्य अशी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. फाऊंटेनच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव गेल्या वर्षीच पारित करण्यात आला होता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार हे म्युझिकल फाऊंटेन २०२०च्या मध्यापर्यंत पूर्ण करण्याची सूचनाही देण्यात आली होती. त्याअनुषंगाने, फुटाळा तलाव आता देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण केंद्र ठरणार आहे, हे विशेष.
ऐतिहासिक निकासी यंत्रणा नष्ट होणार!
फुटाळा वस्ती ते सेमिनरी हिलपर्यंत जाणाऱ्या फुटाळा रस्त्याच्या कडेला जुन्या ऐतिहासिक निकासी यंत्रणा आहेत. पावसाळी काळात तलाव पाण्याने तुडुंब भरले की याच निकासी यंत्रणेवाटे ओव्हरफ्लोचा निचरा होत असे. काळाच्या ओघात तशीही ही यंत्रणा प्लास्टिकच्या कचऱ्याने बंद झाली असली तरी त्याचे महत्त्व आपात्कालीन स्थितीत आजही होत होते. मात्र, जो नवा रस्ता तयार केला जात आहे त्या रस्त्याच्या मधोमध या यंत्रणेची निकासी असल्याने, त्या नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक तर या यंत्रणा ऐतिहासिक असल्याने, त्याचा बचाव करण्यासोबतच, ते सुरक्षित राहतील. याचा विचार महामेट्रो प्रशासन कशा तऱ्हेने करते, हे बघणे उत्सुकतेचे राहणार आहे.
५० फुटापर्यंत उडणार कारंजे, दिसणार नागपूरचा इतिहास
या म्युझिकल फाऊंटेनच्या कारंज्याद्वारे नागपूरचा गौरवपूर्ण इतिहास नव्या पिढीपुढे आणि पर्यटकांपुढे उजागर केला जाणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे हे फाऊंटेन उभारले जाणार असून, यात ९४ कारंजे असणार आहेत. त्यात फुटाळा तलावावर ४५ बाय १३ मीटरचे पाण्याचे दोन पडदे तयार होतील. यातील सर्वात उंच कारंजा ५० मीटरचा, तर ३५ मीटरचे ६४ आणि २५ मीटर उंचीपर्यंत पोहोचणारे दहा कारंजे असतील. हे दृश्य बघण्यासाठी सध्याच्या मुख्य रस्त्यावर हजारो प्रेक्षक बसू शकतील, अशी प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे. म्युझिकल फाऊंटनची विशेषता म्हणजे ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार पद्मश्री ए.आर. रेहमान यांचे संगीत आणि गीतकार पद्मश्री गुलजार यांचा आवाज. फाऊंटेनच्या साऊंड डिझाईनची जबाबदारी ऑस्कर विजेता पद्मश्री रसेल पुकुट्टी यांना सोपविण्यात आली आहे. प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रेवती याचे व्यवस्थापन करणार आहे.