भगवान कृष्णाच्या लीलावर्णनाचा संगीतमय कार्यक्रम
By admin | Published: September 14, 2015 03:28 AM2015-09-14T03:28:17+5:302015-09-14T03:28:17+5:30
भगवान कृष्णाच्या चरित्राचे सर्वांनाच आकर्षण वाटते, कारण कृष्णाचे चरित्र मानवी जीवनाशी आणि भावभावनांशी जुळले आहे.
कथा गोविंद : सांदीपनीचे श्री श्री पर्व
नागपूर : भगवान कृष्णाच्या चरित्राचे सर्वांनाच आकर्षण वाटते, कारण कृष्णाचे चरित्र मानवी जीवनाशी आणि भावभावनांशी जुळले आहे. भगवंतांनी मानवी अवतार घेतला असला तरी सखा, मित्र, योद्धा, तत्त्वज्ञ अशा विविध स्वरूपातले आदर्श कृष्णाने निर्माण केले आहेत. पण या साऱ्यांपेक्षा मोह पडतो तो कृष्णाच्या बालवयाचा. त्याचे दही, दूध चोरी करणे असो वा सखींच्या खोड्या करणे, त्यांना सतावणे असो. या दैवी लीलांचे नेहमीच भाविकांना कुतुहलमिश्रित आकर्षण वाटते. भगवान कृष्णाच्या लीलांचा नृत्य आणि संगीतमय कार्यक्रम रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला.
सांदीपनी स्कूलच्यावतीने शाळेच्या संस्थापक दिनानिमित्त दरवर्षी श्री श्री पर्व आयोजित करण्यात येते. या अंतर्गत आज सिव्हिल लाईन्स शाखेतर्फे ‘कथा गोविंद’ कार्यक्रमात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या बाललीलांचे तयारीने सादरीकरण केले.
शाळेचे संस्थापक डॉ. श्रीकांत जिचकार यांचा जन्मदिनाचेही कार्यक्रमाचे औचित्य होते. त्यांचे प्रेरणास्रोत भगवान श्रीकृष्ण असल्याने शाळेतर्फे दरवर्षी श्री श्री पर्व आयोजित करण्यात येते. आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील अप्रचलित कथांवर आधारित सादरीकरण करण्यात आले. यासाठी शाळेच्या शिक्षकांनी कृष्णचरित्राचा सूक्ष्म अभ्यास केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किशोर टावरी उपस्थित होते. लहान मुलांनी कृष्णकाळातील केलेली वेशभूषा, रंगीबेरंगी वस्त्र, अनेक सुरेल भजने आणि गीते तसेच त्यावर मुलांचे नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून असलेले मोहक सादरीकरण उपस्थितांना सुखावणारे होते. भगवान कृष्णाचा जन्म, त्याच्या जन्मापूर्वीचा इतिहास, कंसाने त्याच्या पित्याला केलेले बंदिवान, देवकीचा विवाह आणि देवकी व वसुदेवाला कारागृहात टाकल्यानंतर त्यांच्या सहा अपत्यांची हत्या आदी प्रसंग यावेळी तयारीने सादर करण्यात आले. हा कार्यक्रम शाळेच्या प्रमुख सल्लागार लता थेरगावकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जिचकार, प्रशासक आर. के. देशपांडे, व्यवस्थापिका मृणालिनी काळे, मुख्याध्यापिका भारती बिजवे, शांती मेनन, मल्का फैजुद्दीन प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)