गानकोकिळा लतादीदींना संगीतमय मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:18 AM2019-10-05T00:18:21+5:302019-10-05T00:19:27+5:30
सूरसप्तक संस्थेतर्फेही या निमित्तानो दोन दिवसांचा ‘लता संगीत समारोह’ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या स्वर्गीय सूरांपुढे नतमस्तक होऊन, या गानसरस्वतीचा ९०वा वाढदिवस जागतिक पातळीवर साजरा केला जात आहे. सूरसप्तक संस्थेतर्फेही या निमित्तानो दोन दिवसांचा ‘लता संगीत समारोह’ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या संचालिका सुचित्रा कातरकर यांच्या संकल्पनेसह पहिल्या दिवशी ‘लता तुम जिओ हजारो साल’ हा हिंदी सिनेगीतांचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी, सुचित्रासह संगीता भगत, अरुण ओझरकर, प्रतीक्षा पट्टलवार, ऋचा येनूरकर, आशिष घाटे, पद्मजा सिन्हा, डॉ. अमोल कुळकर्णी, अपूर्व मासोदकर, मुकुल पांडे या गायकांनी समरसतेने २५ रोमांचक गीते सादर केली. सुचित्राच्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतासह सुरू झालेल्या कार्यक्रमात.. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, वादा कर ले साजना, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, पंख होते तो उड आती रे, परबत के इस पार, क्या यहीं प्यार है, अशी सुरुवातीची गीते होती. नुकतेच निधन झालेले महान संगीतकार खय्याम यांना यावेळी ‘बाजार’ चित्रपटातील गजल ‘फिर छिडी रात फुलो की’ गाऊन स्वरश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक विजया मारोतकर यांनी केले. तर रसिले निवेदन शुभांगी रायलू यांचे होते. परिमल जोशी, गौरव टांकसाळे, रवी सातफळे, महेंद्र वाटूलकर, नंदू गोहणे, पंकज यादव, तुषार विघ्ने, विजय देशपांडे, आर्या देशपांडे, निशिकांत देशमुख यांनी सुरेल सहसंगत केली.
दुसऱ्या दिवशी लतादीदींनी गायलेल्या व ‘आनंदघन’ नावाने स्वरबद्ध केलेल्या मराठी गीतांसह कवयित्री सुचित्रा कातरकर यांनी लतादीदींवर लिहिलेल्या मराठी गीतांचा ‘स्वरलते तुज मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम सादर झाला. सुचित्रासह पद्मजा सिन्हा, अरुण ओझरकर, प्रतीक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, ऋचा येनूरकर, संगीता भगत, अर्चना उचके, दीपाली पनके, अनुजा जोशी, दीपाली सप्रे, आदित्य फडके, कुमार केळकर हे गायक व गायिका सहभागी होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘गणराज रंगी नाचतो’ या प्रार्थनेवरील शुभांगी दोडके यांच्या नृत्याने झाली.
त्यानंतर ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’ या शिवआरतीने मैफिलीस सुरुवात झाली. यावेळी २७ गीते सादर करण्यात आली. हृदयी जागा तू अनुरागा, मालवून टाक दीप, संधिकाली आशा, डौल मोराचा, सख्या रे घायाळ मी हरिणी, राजसा जवळी जरा बसा, या चिमण्यांनो परत फिरारे, विसरू नको श्रीरामा मला, अशा लतादीदींनी मूळ गीतांसह सुचित्राने लतादीदींवर लिहिलेल्या.. ये मोगरा फुलून, जागेपणी तुला मी, स्वतंत्र भारतास तू, हृदयी ओंकार, स्वरात लहरी, स्वरलते तुला मानाचा मुजरा या गीतांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी फडनाईक व डोके दाम्पत्य, वास्तुविशारद माधव देशपांडे, निवेदन किशोर गलांडे, मधुरिका गडकरी, सीमा जोशी, शंकर लुंगे, विजया मारोतकर, वर्षा किडे-कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.