शास्त्रीय संगीताच्या रसाने श्रोते मंत्रमुग्ध
By admin | Published: August 18, 2015 03:34 AM2015-08-18T03:34:34+5:302015-08-18T03:34:34+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित तीन दिवसीय डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाला
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित तीन दिवसीय डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाला सोमवारपासून सुरुवात झाली. समारोहाच्या पहिल्याच दिवशी युवा शास्त्रीय गायक आदित्य मोडक व प्रख्यात शास्त्रीय गायिका पद्मभूषण गिरीजा देवी यांच्या गायनाने व बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या बासरीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
तत्पूर्वी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात समारोहाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, न्यायामूर्ती प्रसन्न वराडे, माजी मंत्री रणजित देशमुख, हॉटेल अशोकाचे संजय गुप्ता, आर.आर. मिश्रा, विभागीय आयुक्त अनुप कुमार, बसंतलाल शॉ व केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
समारोहाचा शुभारंभ केंद्रातर्फे आयोजित युवा शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेता कलावंत आदित्य मोडक याच्या शास्त्रीय गायनाने झाले. राग मुलतानीतील रसिल्या अर्थभावाच्या बंदिशीसह आदित्यच्या प्रशंसनीय सादरीकरणाने रसिकांना रिझविले. विलंबित झुमरा तालातील ‘कवन देस गयो...’, द्रुत तीन तालातील ‘हमसे तुम लार करो जी...,’ व एकतालातील ‘नैननमे आनबान...’ या बंदिशींचा सुरेल रागाविष्कार श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. तबल्यावर राजू गुजर, तानपुऱ्यावर परिमल कोल्हटकर व संवादिनीवर श्रीकांत पिसे या सहकलाकारांनी आदित्यला साथ दिली. यानंतर सुविख्यात बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या बासरीचे स्वर केंद्राच्या परिसरात निनादले. मधाळ बासरीच्या स्वरांनी देश-विदेशात रसिकप्रिय ठरलेल्या राकेश चौरसिया यांनी राग जोगसह वादनाचा आरंभ केला. त्यानंतर रागाची चौकट तयार करून विलंबित मत्तताल व द्रुत तीन तालातील गत वादनासह हे राग स्वरूप सुरेलतेने साकारले. नागपुरातील प्रतिभावान कलाकार मुकुंद लेकुरवाळे यांनी तयार केलेल्या बासरीसह चौरसिया यांचे सादरीकरण अतिशय श्रवणीय ठरले.
तबल्यावर कालिनाथ मिश्रा व तानपुऱ्यावर श्रुती पांडवकर या सहकलाकारांनी उत्तम साथ दिली. त्यानंतर पद्मभूषण गिरीजा देवी यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचे समापन झाले. ‘ठुमरीची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त बनारस घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गिरीजा देवी यांनी बऱ्याच वर्षानंतर आज सादरीकरण केले. वर्षाऋतुला अनुरूप राग मेघाने त्यांनी गायनाला सुरुवात केली. विलंबित रागातील ‘घन गरजत बरसत आए...’ द्रुत रागातील ‘गगन गरजत चमकत रागिणी...’ अशा बंदिशी त्यांनी सादर केल्या.
यासह खास खमाज रागातील ‘सावरियां को देखे बिना आवे ना चैन...’ व रसिला दादरा या भजनाच्या सुखद सादरीकरणाला नागपूरकरांचा जोरदार प्रतिसाद लाभला. तबला, सारंगी, हार्मोनियम व तानपुऱ्यावर अनुराधा पॉल, सरवर हुसेन, संदीप गुरमुले, शालिनी वेद व रिता देव यांनी साथ दिली.
तत्पूर्वी केंद्रातर्फे आयोजित युवा हिंदुस्थानी व कर्नाटक शास्त्रीय संगीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. नागपूरचा तरुण लाला (तबलावादन), दीप्ती एस. नामजोशी, मुंबई (हिंदुस्थानी शास्त्रीय गायन) व नागनाथ आडगावकर, लातूर (गायन) हे प्रथम तर बी. आर. सुब्रम्हण्यम शास्त्री, बेंगळुरू (कर्नाटक शैली-बासरीवादन), अमृता एस. मोगल, नाशिक (हिंदुस्थानी शास्त्रीय गायन) हे द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरले. कार्यक्रमाचे संचालन व सुरेल निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचे हे २४ वे यशस्वी आयोजन आहे. नवोदित प्रतिभावान कलाकारांसह आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त कलाकारांच्या शास्त्रीय गायन-वादनाची अनुभूती प्रदान करणारा हा समारोह विदर्भाच्या सांस्कृतिक कलावैभवात मोलाची भर टाकणाराच आहे.(प्रतिनिधी)