मुस्लीम मोर्चाने वाढवली होती पोलिसांची धडधड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 01:19 AM2019-12-21T01:19:51+5:302019-12-21T01:21:12+5:30
मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हिवाळी अधिवेशन आणि भव्य मोर्चे नागपूरकरांसाठी नवीन नाही. पोलिसांना नागपुरात मोर्चे हाताळण्याची सवय झाली आहे. मात्र, देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता २० डिसेंबरला सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात निघणारा मुस्लिमांचा मोर्चा लक्षवेधी राहील, असे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांच्या हृदयाची धडधड वाढली होती. राज्याचे सरकार नागपुरात आहे. मोर्चात काही उलटसुलट झाले तर त्याचे पडसाद देशभर उमटू शकतात, याची कल्पना असल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी खबरदारीचे सर्व उपाय केले होते. मोर्चाच्या आयोजकांसोबत बैठका घेतल्या. कुणीही चिथावणी देणारे भाषण करणार नाही, मोर्चेकरी हिंसक होतील किंवा कुणाच्या भावना दुखावतील, अशा घोषणा करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी पोलीस धोका पत्करायला तयार नव्हते. कारण मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोर्चात हजारोंच्या संख्येत मंडळी सहभागी होणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे मोर्चाच्या सुरुवातीपासून तो शेवटच्या पॉर्इंटपर्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त, सहआयुक्त, सर्वच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकाºयांसह सुमारे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन कॅमेरातून मोर्चावर नजर रोखण्यात आली होती. संविधान बचाव या बॅनरखाली चिटणीस पार्क येथून निघालेला हा मोर्चा सेंट्रल एव्हेन्यू, रामझुला मार्गाने एलआयसी चौकातील मोर्चा पॉर्इंटवर पोहचला. मोर्चात मुस्लिमांसोबतच अन्य धर्माचेही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची संख्या पोलिसांची धडधड वाढवत होती. मात्र,मोर्चा शांततेत पार पडला अन् पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सर्वांना धन्यवाद : पोलीस आयुक्त
धार्मिक आणि सामाजिक सौहार्द जपणारे शहर म्हणून नागपूरची देशभर ख्याती आहे. आजचा एवढा प्रचंड मोर्चा निघाला अन् कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यासाठी मोर्चेकरी अन् नागपूर जनतेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.