मुस्लिमांनी मूलनिवासींसोबत संवाद वाढवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 01:39 AM2017-11-06T01:39:44+5:302017-11-06T01:39:57+5:30
मुस्लिमांना नेहमीच आतंकवादी कारवायात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु मुस्लिम हे आतंकवादी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आतंकवादी कारवाया घडविण्याचे काम करते...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुस्लिमांना नेहमीच आतंकवादी कारवायात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु मुस्लिम हे आतंकवादी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आतंकवादी कारवाया घडविण्याचे काम करते. या षड्यंत्राविरुद्ध सावध होऊन मुस्लिम बांधवांनी आपल्यावरील अत्याचार दूर करण्यासाठी एस. सी, एस. टी, एन. टी. ओबीसी या मूलनिवासींसोबत संवाद वाढवावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मौलाना खलिलुल रहेमान सज्जाद नोमानी यांनी केले.
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्यावतीने कस्तूरचंद पार्कच्या मैदानावर आयोजित पूर्व विदर्भस्तरीय जलस्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम होते. व्यासपीठावर जागतिक लिंगायत परिषद कर्नाटकचे कोरणेश्वर स्वामी, माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरात, सुखदेव जानोरकर, गुरुद्वाराचे पूर्व प्रधान मलकित सिंग बल उपस्थित होते. नोमानी म्हणाले, भारतात अत्याचाराने सीमा गाठली आहे. मुस्लिमांनी केवळ नमाज न पढता समाजातील अत्याचार झालेल्यांशी नाते जोडण्याची गरज आहे. माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ म्हणाले, आयबी ही गुप्तचर संघटना ब्राह्मणांनी काबीज केली असून हेमंत करकरे यांनी मालेगावच्या स्फोटात हिंदू संघटना असल्याची बाब उघडकीस आणली. परंतु करकरेंनाच संपविण्याचे काम या हिंदू संघटनांनी केले. मलकित सिंग बल म्हणाले, देशाला अंतर्गत शक्तींपासून धोका आहे. सर्व धर्मांना एकमेकांशी लढवत ठेऊन आपला स्वार्थ साधणाºयांविरुद्ध सावध होण्याची गरज आहे. कोरणेश्वर स्वामी यांनी ब्राह्मणांनी लिंगायत धर्मावर अत्याचार केल्यामुळे वेगळा धर्म स्थापन करण्यात आल्याचे सांगून सर्वांना ब्राह्मणवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले. प्रा. विलास खरात यांनी त्रस्त लोकांना एकत्र करण्याचे काम राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले.
सुखदेव जानोरकर यांनी लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नसताना हा कोणता विकास आहे, असा प्रश्न उपस्थित केला. भोपाळच्या भिक्खूणी संघमित्रा यांनी राष्ट्रीय एकता जोपासून देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आवाहन केले. अकिल मिर्झा यांनी अत्याचार करणाºयांना रोखण्याचे आवाहन केले.
हमीमुल्ला कासीम यांनी मुलनिवासींना वेगवेगळे करून देशा बाहेरील लोक सत्ता भोगत असल्याचे सांगितले. डॉ. वंदना बेंजामीन यांनी एकता हाच एकमेव पर्याय असून प्रत्येकाने संविधानानुसार वाटचाल करण्याचे आवाहन केले. आभार रहमत अली यांनी मानले.
एससी, एसटीला हिंदू समजू नका : वामन मेश्राम
अनुसूचित जाती, जमातीला ब्राह्मणांनी स्पर्शही न करता येणारी जमात म्हणून घोषित केले. तरीही मुस्लिम बांधव आदिवासी, एससी समाजाला हिंदू समजतात. साडेतीन टक्के ब्राह्मणात इतरांचा समावेश झाल्यामुळे ब्राह्मणांची संख्या ७८ टक्के झाली असून ते बहुसंख्य होऊन इतरांवर राज्य करीत आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधानच काय तर गावचा सरपंच होण्याची त्यांची पात्रता नाही. मोदींनी ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती बंद करून त्यांच्यावर अन्याय केला. आम्ही मुस्लिमांसोबत मिळून याविरुद्ध लढाई लढवू इच्छित आहोत. मूलनिवासींना सहा हजार जातीत विभागणाºया ब्राह्मणांपासून सावध होऊन मुस्लिमांनी काँग्रेस, भाजपाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध करण्याचे आवाहन मेश्राम यांनी केले.