'अम्मा कि थाली'चा दरवळ पोहचला १० लाख खवैय्यांच्या जिभेवर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 01:27 PM2020-11-05T13:27:01+5:302020-11-05T16:25:31+5:30
Nagpur News Food अम्माजींचे नाव आहे, श्रीमती शशिकला कैलासनाथ चौरसिया. वय वर्षे अवघे ४६. त्या राहतात उत्तरप्रदेशातील वाराणशीत.
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आज हम आपको सिखायेंगे मोतीचूर के लड्डू.. मिठे में सब लोग लड्डू खाना बहोत पसंद करते है.. बच्चे खासकर इसे पसंद करते है..आज हम एकदम हलवाई के जैसे लड्डू बनाकर आपको दिखाते है.. लड्डू के लिये हम पहले चासनी बनायेंगे..
खास जौनपुरी लहजा असलेला हा आवाज आहे अम्मा यांचा. अलिकडेच 'अम्मा की थाली' या चॅनेलने १० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.. कोण आहे या अम्मा.. ज्यांच्या साध्यासुध्या भाषेतील निवेदनाची आणि अतिशय चविष्ट वाटणाऱ्या पदार्थांची भुरळ देशविदेशातील खवैय्यांना पडली आहे.
अम्माजींचे नाव आहे, श्रीमती शशिकला कैलासनाथ चौरसिया. वय वर्षे अवघे ४६. त्या राहतात उत्तरप्रदेशातील वाराणशीत..
अम्माजी मूळच्या जौनपूरच्या. पाचवीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांचे यजमान कैलाशनाथ यांचे मिठाईचे दुकान आहे. अम्माजींना तीन मुले चंदन, पंकज व सूरज. एक मुलगी, गुंजा. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. मुले मोठी असून, यू ट्यूब चॅनेलची जबाबदारी चंदन हा त्यांचा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मुलगा सांभाळतो.
गोड पदार्थ असो, नाश्त्याचे असो, मुख्य जेवणाचे असो वा सणासुदीचे विशेष असो, अम्माजीकडे वैशिष्टयपूर्ण पद्धतीची रेसिपी मिळण्याची हमी असते. अम्माजींचा पत्ता शोधून, नंबर काढून त्यांच्यापर्यंत पोहचता तर आलं पण त्यांच्याशी बोलता मात्र आलं नाही. कारण त्यांचा संकोची स्वभाव. त्यांचा मुलगा चंदन याच्याकडून मग अम्माजींबद्दल माहिती घेतली.
माहेरी मोठ्या संयुक्त कुटुंबात वाढलेल्या शशिकला यांना लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. आपल्या आईच्या हाताखाली त्यांनी पाककलेचे धडे गिरविले. त्यांच्या हाताला वेगळीच चव असल्याचे सर्वांनाच जाणवले आणि पाहता पाहता त्यांच्यातील या गुणाची ख्याती पसरली. लग्नानंतरही सासरी मोठे कुटुंब होते. घरात किमान २०-२५ जण असायचे. त्या सगळ्याच्या खाण्यापिण्याच्या आवडी व गरजा लक्षात ठेवून शशिकला यांनी आपले अन्नपूर्णेचे व्रत नेमाने पाळले.
आपल्या आईच्या हातासारखी चव कुठेच नाही हे जाणवलेल्या चंदनने मग २०१७ मध्ये त्यांचा पहिला व्हिडिओ अपलोड केला. तो होता बुंदीच्या खिरीचा. पुढचे सहा महिने त्यांचे काही व्हिडिओज त्याने अपलोड केले. मात्र फारसा प्रतिसाद नव्हता असं तो सांगतो. नंतर त्यांनी केलेलं आंब्याचं लोणचं पाहता पाहता लोकप्रिय झालं आणि तिथून सुरू झाला अम्मा की थालीचा रुचकर प्रवास. त्यांना घरी सगळेच अम्मा म्हणतात. त्यामुळेच या चॅनेलचे नाव अम्मा की थाली असे ठेवावे असं त्यांच्या मुलांनी मिळून ठरवले.
इन्स्टाग्राम, फेसबुकवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवरही त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली होती.
शशिकला चौरसिया या स्वभावाने संकोची असून त्या फारशा लोकात मिसळत नाहीत. त्यांचे घर, मुले, पाहुणेरावळे आणि त्यांचे स्वयंपाकघर हेच त्यांचे विश्व असल्याचे चंदन चौरसिया सांगतात. आतापर्यंत चारशेहून अधिक रेसिपीज अपलोड झाल्या असल्या तरी अम्माजीकडे अजून बऱ्याच रेसिपीज शिल्लक आहेत असं चंदन चौरसिया सांगतात. घरातीलच पदार्थ वापरून बनवण्याची त्यांची पद्धत सर्वांना आपलीशी वाटते. नेहमी बनवले जाणाऱ्या भाज्या वेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या यावरही अम्माजी यांचा भर असतो.
येत्या काळात अम्माजी यांच्या चॅनेलवर अजूनही काही वैशिष्ट्यपूर्ण रेसिपीज दाखवण्याचा त्यांचा मानस आहे. अम्माजी की थाली यांची वेबसाईटही आहे.