'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 08:46 PM2023-04-16T20:46:39+5:302023-04-16T20:47:27+5:30
आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली.
नागपूर: आज राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पुन्हा एकदा सरकार पाडण्यावरुन शिंदेगड आणि भाजपवर जोरदार टीका केली.
यावेली बोलताना उद्ध ठाकरे म्हणाले, 'आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो पण, देशातील लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रांसाठीच होत आहे. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत आहे. भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.'
'आमच्या सरकारने काहीच कामे केली नाही, असे ते बोलतात. पण, आमच्या काळात जागतिक संकट आले होते. आज चार चार दिवसांनी गारपीट होते, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तरीदेखील शेतकऱ्यांना काही मिळतं नाही. हे उलट्या पायाचे सरकार आहे. आमचं सरकार नालायक असतं, तर एवढी लोकं आलीच नसती. आमच्या काळात आम्ही कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती. आजचे सरकार भूलथापा मारणारे सरकार आहे,' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
ते पुढे म्हणतात, 'आमचं सरकार यांनी गद्दारी करुन पाडलं. यांनी आमच्या पाठीत वार केला. महाराष्ट्र शूरांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर आणि वार करू तर छातीवरच करू. ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आजचे मुख्यमंत्री अयोध्येला जातात. पण, हे खरंच रामभक्त असते तर आधी सूरत-गुवाहाटीला न जाता अदोध्येले गेले असते.'
'आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे गेले. तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच यांचा दौरा होता. आज शेतकऱ्यांना रात्रभर झोप येत नाही आणि सत्ताधारी देवदर्शनाला जातात. रामराज्य कधी येणार माझ्या महाराष्ट्रात, देशात? तुमच्या पदाचा काय उपयोग ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.