माझी कन्या भाग्यश्री योजना : पैसे आले, पण खातेच उघडले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:19 PM2018-04-30T15:19:34+5:302018-04-30T15:19:54+5:30
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही.
समाजाने आधुनिकतेचा पेहरावा पांघरला असला तरी, वंशाचा दिव्यासाठी आग्रह आजही कायम आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्माचे दर फार कमी आहे. हे प्रमाण दिवसेदिवस कमी होत असून अत्यंत चिंताजनक आहे. मुलींच्या जन्माचा दर वाढावा म्हणून शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. याच उपक्रमातंर्गत ‘माझी कन्या भागश्री’ ही योजना सुरू करण्यात आली. योजनेंतर्गत एका मुलीनंतर जर कोणत्या कुटुंबाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावावर महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ५० हजार रूपयांचा फिक्स डिपॉझिट केले जाते. जर दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रूपयांचे फिक्स डिपॉझिट केले जाते. ही रक्कम राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करुन दिली जाते. सहा-सहा वर्षांनंतर लाभार्थी त्या रकमेच्या व्याजाची उचलही करू शकतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जर त्या दहावी पास आहेत व त्यांचे लग्न झाले नाही तर त्यांना जमा रक्कम व व्याजाची रक्कम एकत्र बँकेतून मिळते. एखादा पालक जर गरीब आहे तर या रकमेमुळे मुलीच्या लग्नाची त्याची चिंता मिटू शकते. याच दृष्टीकोनातून शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरूवात १ एप्रिल २०१६ पासून राज्य शासनाने केली. तसेच १ आॅगस्ट २०१७ पासून सुधारित ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची सुरूवात झाली. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाला यासंदर्भात विचारणा केली असता १२९ अर्ज आलेले आहेत. ते शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र शासनाकडून सदर लाभार्थी मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिटमध्ये जमा करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात दिरंगाई झाली. परंतु निधी मिळाल्यानंतरही लाभार्थ्यांनी मुलींच्या नावाचे खाते बँकेत उघडलेच नसल्याने प्रशासनाला लाभार्थ्यांचा निधी त्यांच्या खात्यात जमा करता आला नाही.
बँकेशी करणार करार
या योजनेसाठी आता ३९ लाखांचा निधी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे बँकेशी करार करून लाभार्थ्यांची खाते उघडण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे.