२१ महिने माझा व कुटुंबीयांचा छळ करण्यात आला; अनिल देशमुख यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 10:13 PM2023-02-11T22:13:40+5:302023-02-11T22:14:06+5:30
Nagpur News तब्बल २१ महिने माझा व कुटुंबीयांचा छळ करण्यात आला, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत केला.
नागपूर : ऐकीव माहितीच्या आधारे मला १४ महिने तुरुंगात डांबण्यात आले. चौकशीत कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. या सर्व घटनाक्रमात तब्बल २१ महिने माझा व कुटुंबीयांचा छळ करण्यात आला, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत केला.
देशमुख यांनी शनिवारी नागपुरात आगमन झाले. समर्थकांनी भव्य रॅली काढून त्यांचे स्वागत केले. श्रद्धा बंगल्यावर पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, माझा जो काही छळ झाला त्याचे मला दु:ख आहे. माझे कुटुंबीय, सहकारी यांनाही त्रास सहन करावा लागला. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबला ठेवण्यात आलेल्या आर्थर रोड जेलमध्ये मला ठेवण्यात आले. १३० धाडी टाकण्यात आल्या. पण काहीच सापडले नाही. २३० सहकाऱ्यांचे बयाण घेण्यात आले. गुन्हा केला असता तर काहीच वाटले नसते. पण खोट्या आरोपावर जेलमध्ये डांबून ठेवले, असा आरोप त्यांनी केला.
परमवीर सिंग व सचिन वाझे यांच्या मागे अदृश्य हात
- माझ्यावर १०० कोटींचा आरोप केला. पण आरोप पत्रात १ कोटी ७१ लाख नमूद केले. त्याचेही पुरावे देऊ शकले नाही. माझ्यावर आरोप करणारा सचिन वझे हा अनेक गुन्ह्यात आरोपी आहे. त्यामुळे त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. परमवीर सिंग व सचिन वाझे यांच्या मागे कुणाचा अदृश्य हात आहे, याची मी माहिती घेईल, असे सूचक वक्तव्यही देशमुख यांनी केले.
जाहीर सभेत सर्व सांगणार
- १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काटोल येथे जाहीर सभा घेणार आहे. त्या सभेत मी माझ्या सर्व समर्थकांना जाहीरपणे सर्वकाही सांगणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.