‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:12 PM2020-10-01T20:12:36+5:302020-10-01T20:18:58+5:30
राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत. अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्यानंतर स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी फक्त ‘आशा’ स्वयंसेविकांवर आली. आता आशांनीही सहभाग काढण्याचा निर्णय घेतला असून, ५ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनाचे हे महत्त्वपूर्ण अभियान जिल्ह्यात वाºयावर आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सरकार व्यापक सर्वेक्षण करणार होते. जास्तीत जास्त लोकांना टेस्ट करण्यास प्रोत्साहित करणार होते. प्रत्येक ५० कुटुंबामागे एक टीम वॉच ठेवणार होती. पण हे अभियान जिल्ह्यात वादग्रस्त ठरले आहे. अंगणवाडी सेविकांनी काही अटी शासनापुढे ठेवल्या असून, शासन त्यावर निर्णय घेण्यास सक्षम नसल्याने त्यांनी सर्वेक्षणास नकार दिला. सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही. ‘आशा’ स्वयंसेवक कशाबशा सर्वेक्षण करीत होत्या. परंतु आता आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने बेमूदत कामबंदचा इशारा दिला आहे. सीटूच्या प्रतिनिधीमंडळाने महापालिकेचे सहा. अप्पर आयुक्त राम जोशी यांच्यापुढे आपले गाºहाणे मांडण्याचा प्रयत्न केला. २८ सप्टेंबर रोजी त्यांना बोलाविले होते. पण कक्षात घेतले नाही. परत ३० सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांना बोलाविण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या कार्यालयात गेले. कक्षापुढे बराच वेळ उभे राहिले. पण प्रतिनिधीमंडळाला बोलाविण्यात आले नाही. अधिकारी चर्चा करायला तयार नाहीत, शासन ऐकायला तयार नाही, त्यामुळे ५ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आशा स्वयंसेविकांनी घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले.
अशा आहेत मागण्या
१) आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोरोना कामाचे ३०० रु. रोज द्यावेत.
२) कोरोना सर्व्हे करताना मुबलक सुरक्षा साहित्य द्यावे.
३) कोरोनाबाधीत झालेल्या आशा किंवा गट प्रवर्तक यांचे मानधन कपात करू नये.
४) आशा व गट प्रवर्तक यांची प्रताडना थांबवावी.
५) सर्व्हे करताना आशांसोबत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवक देण्यात यावेत.