'मेरे मित्र नितीनजी, आप बोलते बहुत प्यारे हो, लेटर भी सख्त लिखते हो'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 02:57 PM2021-08-20T14:57:36+5:302021-08-20T15:01:03+5:30
Nagpur News Nitin Gadkari जनतेच्या विकास कामात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाच्या मार्गात स्पीड ब्रेकर येऊ देणार नाही. माझा स्वभाव शिस्तीचा असून जलद गतीने प्रवास व विकास व्हावा, यावर नेहमीच भर असतो. माझे मित्र नितीनजी, ‘आप बोलते बहुत प्यारे हो, पर लेटर भी सक्त लिखते हो’. कर्तव्य कठोर आहे. ते लिहावेच लागेल. तुम्हा-आम्हाला बाळासाहेबांची शिकवण मिळाली आहे. जनतेच्या विकास कामात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे दिली. ('My friend Nitinji, you are very lovely in speaking, you also write strong letters')
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत झिरो माईल व कस्तुरचंद पार्क स्टेशन आणि मार्ग व फ्रीडम पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे झाले. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली.
नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम महामार्गाच्या कामात शिवसैनिक अडथळे आणत असून ते वसुलीसाठी कंत्राटदारांची उपकरणे व साहित्य जाळतात. शिवसैनिकांमुळेच महामार्गाच्या कामाला उशीर होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते.
या पत्राची चर्चा संपूर्ण राज्यात ‘लेटरबॉम्ब’ म्हणून झाली होती. या लेटरबॉम्बवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता शिवसैनिकांनी तंबी दिली होती. शुक्रवारच्या कार्यक्रमात दोन्ही नेते हजर असल्याने मुख्यमंत्री लेटरबॉम्बला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी ‘माझे मित्र नितीनजी’ असा उल्लेख करीत लेटरबॉम्बला उत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या विकास कामांच्या आड कुणीलाही येऊ देणार नाही. तो अधिकार जनतेचा आहे. जनतेच्या आशीर्वादाने सर्वजण मोठे होतात. आशीर्वाद मोठा असतो. तो जन्मात फेडता येणार नाही. नितीनजी आश्वस्त राहा, विकास कामे होतील.
प्रारंभी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. विकास कामांमुळेच महाराष्ट्र बदलत आहे. भव्य प्रकल्पांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे. ठाणे आणि मुंबईच्या विकास कामांसाठी १ लाख कोटी रुपये देऊ, अशी ग्वाही गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.